पाथरी - जिल्हाधिकारी अचल गोयल यांच्या पाथरी येथील अचानक भेटीमध्ये वाळू प्रकरणाचा मुद्दा पुढे येऊन गुंज आणि कानसुर या सज्जाच्या तलाठ्याचा निष्काळजीपणा उघड झाला. हे प्रकरण दोन्ही तलाठ्याने भोवले असून जिल्हाधिकारी गोयल यांच्या सूचनेनुसार उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी यांनी गुंज सज्जाचे तलाठी पी. एम. जमशेटे आणि कानसूरचे तलाठी उज्वल तवर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
जिल्हाधिकारी अचल गोयल यांनी 13 मार्च रोजी पाथरी येथे एका बालविवाहाच्या प्रकरणांमध्ये अचानक भेट दिली होती. याच भेटीदरम्यान जिल्हाधिकारी गोयल यांनी कानसूर सज्जा अंतर्गत डाकू पिंपरी येथील वाळू घाटाला भेट दिली. यावेळी तलाठी उज्वल तवर हे कार्यालयात उपस्थित नव्हते. तसेच डाकूपिंप्री येथे मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन होत असतानाही कारवाई करण्यात येत नव्हती.
तर दुसऱ्या प्रकरणात जिल्हाधिकारी गोयल यांनी 13 मार्च रोजी पाथरी येथे आढावा बैठक घेतली असता गौडगाव घाटात 40 ते 50 ब्रास अवैध वाळूसाठा केल्याचे पुढे आले. यावेळी गुंज सज्जाचे तलाठी पी एम जमशेटे बैठकीस अनुपस्थित होते. या दोन्ही प्रकरणात शासकीय कामात निष्काळजी केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी गोयल यांच्या सुचनेनुसार गुंज सज्जाचे तलाठी पी. एम. जमशेटे आणि कानसूर सध्याचे तलाठी उज्वल तवर यांना निलंबित करण्यात आले आहे.