परभणी : तालुक्यातील देशमुख पिंपरी शिवारात पूर्णा नदीतून आणलेली वाळू अवैधरित्या वाहतूक केली जात असताना पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने १० जून रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास कारवाई केली आहे. दोन वाहनांसह चार ब्रास वाळू असा १२ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.
तालुक्यातील देशमुख पिंपरी शिवारातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बुधवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी एमएच २२ एएम ०३२८ या क्रमांकाचे ट्रॅक्टर जप्त केले असून, ट्रॅक्टरमधील एक ब्रास वाळू जप्त केली आहे. तसेच एम एच ४० बीएल ६५१८ या टिप्परच्या चालक व मालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या टिपरमधील ३ ब्रास वाळू आणि टिप्पर पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत १२ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन आरोपींविरुद्ध ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक एच.डी. पांचाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक हनुमान कच्छवे, सखाराम टेकुळे, जगदीश रेड्डी, श्रीकांत घनसावंत, अतुल कांदे आदींनी केली आहे.