- विठ्ठल भिसे पाथरी ( परभणी ) : हाताला काम नसल्याने घर खर्च कसा भागणार ? कोणी उधारसुद्धा देत नाही, आता जगायचे कसे ? अशी व्यथा पत्नी पुढे मांडत एका मजुराने विहिरीत उडी घेण्यासाठी धाव घेतली. पत्नीने मोठ्या मुश्किलीने त्याचा हात धरण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघेही विहिरीत कोसळले. यात पतीचा बुडून मृत्यू झाला तर पत्नीला वाचविण्यात यश आले आहे.
शहरातील बसेरा कॉलनी येथे संजय लक्ष्मण उबाळे पत्नी सुमन आणि सात वर्षाच्या मुलासह राहतात. मजुरीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मागील काही दिवसांपासून कामधंदा मिळत नसल्याने संजय तणावग्रस्त होते. दसऱ्याचा सण असल्याने पतीपत्नी घरी असताना तणावात असलेल्या संजयने बऱ्याच दिवसांपासून हाताला काम नाही, घर खर्च कसा चालणार, कोणी उधरही देत नाही अशी व्यथा मांडली. यावर पत्नीने त्याला समजावले. मात्र, काही एक न ऐकता संजय घराच्या बाहेर पडला. पत्नी सुमनने त्याचा पाठलाग केला. संजयने कब्रस्थानचा रस्ता पकडल्याने सुमनने आरडाओरडा करत तिकडे धाव घेतली. परंतु, काही कळायच्या आत संजयने विहिरीत उडी घेतली. हे पाहताच त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात सुमनदेखील विहिरीत पडली.
दरम्यान, सुमनचा आवाज ऐकून गल्लीतील नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली. सुमनला वाचविण्यात यश आले असून पती संजयचा बुडून मृत्यू झाला आहे. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण , सहाय्यक पोलीस निरीक्षक बी आर बंदखडके ,पोलीस उपनिरीक्षक जी एम कराड तसेच पाथरी नगर परिषद अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला आहे. सुमन संजय उबाळे यांच्या माहितीवरून पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नायक गजभार करत आहेत.