परभणी: राष्ट्रीय महामार्ग ६१ मानवत रोड ते परभणी बंद पडलेले काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी परभणी वकील संघाच्या वतीने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
परभणी-मानवत रोड या रस्त्याच्या कामाच्या निविदा निघून ४ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. नियमानुसार कामाचा कालावधी संपला असला तरी अद्यापही या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. कामासाठी अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे. परिणामी वाहनचालकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. तसेच उन्हाळा सुरू झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ वाढली आहे. याचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यातच गेल्या १५ दिवसांपासून या रस्त्याचे काम पूर्णतः बंद आहे. त्यामुळे कामावर प्रशासनाचे कुठलेच नियंत्रण नसल्याचे दिसत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर
ॲड. भारत चिलवंत, ॲड. सुनील जाधव, ॲड. राजेश चव्हाण, ॲड. शैलेश पाटील, ॲड. कैलास पवार, ॲड. विनायक चोखट, ॲड. अंगद बारहाते, ॲड. रमाकांत शिंदे, ॲड.के. एस.रेंगे, ॲड.डी.एस. साळवे, ॲड. बी.एल. यादव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.