परभणी : दक्षिण मध्य रेल्वे विभागातून धावणाऱ्या दोन रेल्वेच्या टर्मिनल स्थानकामध्ये बदल करण्यात आला आहे. यामध्ये सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस ही लिंगमपल्ली येथून तर सिकंदराबाद-मनमाड अजंठा एक्स्प्रेस काचीगुडा येथून सुटणार आहे. याबाबत दक्षिण मध्य रेल्वे विभागाने नुकतेच पत्र काढले आहे. हा बदल १५ डिसेंबरपासून लागू केला जाणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातून धावणाऱ्या सिकंदराबाद-मनमाड अजंठा एक्स्प्रेस आणि सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस या मागील अनेक वर्षांपासूनच्या महत्त्वाच्या रेल्वे आहेत. या दोन्ही रेल्वे गाड्यांना प्रवाशांची सर्वाधिक गर्दी आणि प्राधान्य असते. रेल्वे क्रमांक (१७०६४) सिकंदराबाद-मनमाड अजंठा एक्स्प्रेस १५ डिसेंबरपासून काचीगुडा येथून सायंकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी सुटणार आहे.
तर रेल्वे क्रमांक (१७०५८) सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस ही लिंगमपल्ली स्थानकावरून दुपारी बारा वाजून २५ मिनिटांनी सुटणार आहे. परतीच्या प्रवासात मनमाड-सिकंदराबाद रेल्वे काचीगुडा येथे दररोज सकाळी नऊ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे तसेच मुंबई-लिंगमपल्ली रेल्वे लिंगमपल्ली येथे दररोज दुपारी तीन वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे.