परभणी : येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाऱ्या सात आगारांतील वाहकांमधून ईटीआय मशीनबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे वाहकांसह प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दररोज चार मशीनमध्ये बिघाड होत आहे.
परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड, जिंतूर व परभणी आगारांचा समावेश आहे, तर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत व हिंगोली असे एकूण सात आगार आहेत. या सात आगारांत ८४० वाहक कार्यरत आहेत. या वाहकांकडे प्रवाशांचे तिकीट फाडण्यासाठी ईटीआय मशीन महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून या मशीनमध्ये सातत्याने बिघाड होत असून, दररोज चार मशीन नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे वाहकांसह प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे मागील एक वर्षापासून प्रायमरी सिक्रेट बोर्डच्या बिघाडामुळे दोनशे मशीन मुंबई येथील सर्व्हिस सेंटरकडे पडून आहेत. त्यामुळे वाहक वैतागले आहेत.
वर्षभरात १४६० तक्रारी
गेल्या वर्षभरात परभणी, पाथरी, जिंतूर, गंगाखेड यासह हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, हिंगोली व वसमत या सात आगारांतून ईटीआय मशीन नादुरुस्तीच्या १४६० मशीन विभागीय नियंत्रक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत.
या सात आगाराला जवळपास ६५० ईटीआय मशीनची आवश्यकता असताना केवळ सद्य:स्थितीत ४३३ मशीन कार्यरत आहेत. ८४८ मशीन एस.टी. महामंडळाला प्राप्त झाल्या असतानाही त्यातील ४१५ मशीन नादुरुस्त आहेत. त्यामुळे या सात आगारांतील वाहकांना या मशीनच्या नादुरुस्तीमुळे वारंवार प्रवाशांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे.
४१५ मशीन नादुरुस्त
सात आगारांतील ८४० वाहकांसाठी ८४८ मशीन देण्यात आल्या आहेत. त्यापैकी सद्य:स्थितीत ४३३ मशीन कार्यरत असून, मागील वर्षभरापासून ४१५ मशीन नादुरुस्त आहेत.
आगारनिहाय नादुरुस्त मशीन
परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील सात आगारांकडे ८४८ ईटीआय मशीन देण्यात आल्या आहेत. त्यापैकी परभणी आगारातील १०६, जिंतूर आगारातील ७२, गंगाखेड आगारात ७४, पाथरी आगारात ६४, वसमत आगारात ६१, कळमनुरी आगारातील २२ आणि हिंगोली आगारातील ५६ ईटीआय मशीन या मागील वर्षभरापासून बंद आहेत. त्यामुळे वाहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून, एस.टी. महामंडळ प्रशासन या मशीन मिळाव्यात यासाठी वरिष्ठ स्तराकडे पाठपुरावा करीत आहेत.