सेलू (जि.परभणी) : डस्टर कार आणि दूचाकीवरून अवैधरित्या गुटखा विक्रीसाठी नेतांना सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथील गुरूद्वार आणि करपरा नदीपुलावर शुक्रवारी चारठाणा पोलिसांनी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन ७ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
जालना व मंठा शहरातून जिंतूर कडे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटखा विक्रीसाठी नेला जातो अशी गोपनीय माहिती चारठाणा पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड ,पोउपनी विनोद साने,पोलीस कर्मचारी सुनिल वासलवार,विष्णुदास गरूड,शेख जिलानी,पवन राऊत यांनी देवगावफाटा गुरूद्वार जवळ शुक्रवारी सकाळी १०:३० वा.जिंतूर कडे जाणाऱ्या दुचाकीची झडती घेतली. त्यावेळी २० हजाराचा गुटखा मिळून आला ५० हजाराच्या दुचाकीसह आरोपी योगेश राठोड (रा.कोलदंडी ता.जिंतूर) यास पोलीसांनी अटक केली.
त्यानंतर याच पोलीस पथकाने शनीवारी पहाटे २ वा.देवगावफाटा येथील करपरा नदीवर सापळा लावला. यादरम्यान एका डस्टर कार ची झडती घेतली असता ३ लाख ५० हजाराचा गुटखा मिळून आला यावेळी आरोपी साई दिलीप देशमुख (रा.वस्सा ता.जिंतूर) यास डस्टर कारसह ताब्यात घेऊन ७ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या दोन्ही आरोपींना शनिवारी सेलू न्यायालयात हजर केले अशी माहीती पोलीस सुत्रांनी दिली आहे.