- राजन मंगरुळकरपरभणी : महाविद्यालयातील विद्यार्थिनी राजगोपालचारी उद्यानात जेवत असताना त्यांची एका युवकाने छेड काढली. ही बाब मुलींनी थेट पोलीस अधीक्षकांच्या घरासमोरील कर्मचाऱ्याला सांगितली. ही गंभीर बाब ऐकून स्वतः पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी घराबाहेर पडले अन् स्वतः ते उद्यानात दाखल झाले. त्यांनी छेड काढणाऱ्या मुलाचा पाठलाग करीत त्यास पकडले. काही मिनिटांत सर्व यंत्रणेला वायरलेसद्वारे घटनास्थळाची माहिती त्यांनी दिली. एसपी परदेशी आणि प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांनी युवकाच्या मुसक्या आवळल्या. त्यास ताब्यात घेत नवा मोंढा ठाण्यात आणले. मुलीची छेड काढल्याचे समजतात पोलीस अधीक्षक युवकाच्या मागे धावल्याने पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
हा सर्व प्रकार शुक्रवारी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान घडला. महाविद्यालयातील विद्यार्थिनी डबा खाण्यासाठी उद्यानात बसल्या असता त्यांना एका युवकाने छेडले. त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक यांच्या घरासमोरील पोलिसांना दिली. याचवेळी पोलिस अधीक्षक कार्यालयीन कामकाजासाठी निघाले असता त्यांना ही बाब समजली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सर्व यंत्रणांना अलर्ट करून तत्काळ घटनास्थळी दाखल होण्याचे सांगितले. ते स्वतः या युवकाच्या शोधासाठी राजगोपालचारी उद्यानात गेले. त्यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, शरद मरे, उपनिरीक्षक अर्जुन टरके, अंमलदार सचिन भदर्गे, मोहम्मद इमरान, शेख रफीक. राहुल परसोडे, पंकज उगले, अनिल कटारे हेही युवकाला पकडण्यासाठी उद्यानात गेले. छेड प्रकरणातील श्रवण टेकुळे यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध नवा मोंढा ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस यंत्रणेचे आवाहननागरिकांनी तत्काळ मदतीसाठी डायल ११२ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. महिला व मुलींकरिता अनुक्रमे १०९१ व १०९८ या टोल फ्री क्रमांकावरील संपर्क साधता येतो. नागरिकांनी मदतीसाठी तत्काळ पोलिसांना संपर्क साधावा.
दामिनी पथकांची स्थापनाजिल्ह्यात सर्व ठाण्यांतर्गत दामिनी पथकाची स्थापना केली आहे. पोलीस काका व पोलीस दिदी पथकही कार्यान्वित केले आहे. शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढविली आहे.
पोलीस दलाचे यशही घटना समजताच माझ्यासह सर्व यंत्रणा मदतीसाठी आणि यूवकास ताब्यात घेण्यासाठी धावली. हे सर्वं पोलीस दलाचे यश आहे. यापूढे असे प्रकार किंवा मुलींची छेड काढणाऱ्यांची खैर नाही. - रविंद्रसिंह परदेशी, पोलीस अधीक्षक.