- विजय पाटीलपरभणी : जिल्ह्यातील चारही मतदारसंघांमध्ये लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पाथरी विधानसभेतील बंडखोरी कायम राहिली आहे, तर मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी उमेदवार न देता सोयीप्रमाणे लढा देण्यास सांगितल्याने अनेकांनी आपला स्वपक्ष जवळ केला आहे, तर काहीजण अजूनही तटस्थ दिसत आहेत. पाथरीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बंडखोर माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी आघाडीची, तर भाजपचे माधवराव फड यांनी महायुतीची अडचण केली आहे.
परभणी विधानसभेत वंचितचा उमेदवारच ऐनवेळी बाद झाल्याने या मतदारसंघात आता उद्धवसेनेचे डॉ. राहुल पाटील व शिंदेसेनेचे आनंद भरोसे अशी लढत दिसत आहे. पाथरीत महायुतीचे राजेश विटेकर व महाविकास आघाडीचे सुरेश वरपूडकर यांच्यात लढत आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बंडखोर माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी आघाडीची, तर भाजपचे माधवराव फड यांनी महायुतीची अडचण केली आहे. सईद खान यांनी बंड करीत रासपची उमेदवारी घेतली. जिंतुरातही महायुतीच्या आ. मेघना बोर्डीकर व महाविकास आघाडीचे माजी आ. विजय भांबळे यांच्यात लढत आहे. वंचितचा काय प्रभाव राहील, यावर बरेच गणित अवलंबून आहे. गंगाखेडमध्ये मराठा व ओबीसी वाद पेटत आहे. महाविकास आघाडीचे विशाल कदम व महायुतीचे रत्नाकर गुट्टे यांच्यात लढत आहे, तर आघाडीचे माजी आ. सीताराम घनदाट यांनी बंड करीत वंचितची वाट धरल्याने तिरंगी लढतीकडे मतदारसंघ झुकला आहे.
जरांगे फॅक्टर कोणाच्या मदतीला येणार?मनोज जरांगे यांनी थेट उमेदवार देण्याचे टाळले. त्यामुळे त्यांच्याकडून इच्छुक असलेल्यांपैकी काहींनी आपापला पक्ष जवळ केला. काही अजूनही तटस्थ आहेत. ही मंडळी नेमकी कोणाच्या पारड्यात मताचे दान टाकते, त्यावर काही मतदारसंघांचे भविष्य अवलंबून आहे. बंडखोरीपेक्षाही हा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे.