पाथरी: जिल्ह्यात सर्वाधिक लक्ष या मतदारसंघाकडे लागले असून बंडखोरीमुळे निवडणूक वेगळ्या वळणावर आली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मतदारसंघात एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, शरद पवार गटाच्या बाबाजानी दुर्राणी यांची बंडखोरी कायम राहिल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. ही जागा कॉँग्रेसला सुटली असून विद्यमान आमदार सुरेश वरपूडकर यांच्या अडचणी वाढल्याचे चित्र आहे. आता येथे आघाडीचे वरपूडकर, महायुतीचे विटेकर, बंडखोर अपक्ष दुर्राणी, रासपचे खान, अपक्ष फड यांच्यासह १४ उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होईल.
पाथरी मतदारसंघ हा पाथरी, मानवत, सोनपेठ आणि परभणी ग्रामीण असा विस्तारलेला आहे. येथे लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टरमुळे महाविकास आघाडीचे संजय जाधव यांना २७ हजार पेक्षा अधिक मताधिक्य मिळाले. दरम्यान, विधानसभेला महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सरळ लढतीची अपेक्षा असताना या मतदारसंघात गणित बिघडले असून बहुरंगी लढत होत आहे. रासपचे सईद खान तर शरद पवार गटाचे बंडखोर बाबाजानी दुर्राणी आणि भाजपाचे माजी आमदार फड यांचे वडील माधवराव फड यांची अपक्ष उमेदवारी कायम राहिली आहे. यामुळे महायुती, महाविकास आघाडी या प्रमुख उमेदवारांसह एकूण १४ उमेदवार मैदानात असून बहुरंगी लढत होणार आहे.
युती आणि आघाडीत उमेदवारीवरून घमासान झाले. महायुतीने सुरुवातीला आमदार राजेश विटेकर यांच्या आई निर्मलाताई विटेकर यांना उमेदवारी जाहीर केली; तर महाविकास आघाडीने काँग्रेसच्या विद्यमान आमदार सुरेश वरपूडकर यांना फेरसंधी दिली. वरपूडकर यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष उमेदवारीही भरली. तर दुसरीकडे आमदार विटेकर यांनी आईचा अर्ज न भरता स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने शिंदेसेनेचे अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी राजीनामा देत रासपकडून उमेदवारी घेतली.