लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील असोला येथील श्रीकृष्णधाम परिसरात आयोजित अखिल भारतीय महानुभव संंत संमेलनाचे उद्घाटन १ एप्रिल रोजी पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झाले़असोला येथे संत संमेलनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ या संत संमेलनास देशभरातील संत-महंत उपस्थित झाले आहेत़ रविवारी सकाळी पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले़यावेळी आ़डॉ़राहुल पाटील, आ़रामराव वडकुते, रविराज देशमुख, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, रत्नाकर गुट्टे, सुभाष जावळे, विठ्ठल रबदडे, अनंतराव शिंदे आदींची उपस्थिती होती़ प्रारंभी महंत दुधगावकर बाबा शास्त्री यांनी प्रास्ताविक केले़ मराठी भाषेची निर्मिती केलेल्या महानुभव पंथाच्या चक्रधर स्वामींनी मराठीचा आद्यग्रंथ लिहिला त्या अमरावती जिल्ह्यातील उद्धपूर येथे मराठी साहित्य विद्यापीठाची निर्मिती करावी, अशी मागणी केली़ उद्घाटनपर भाषणात महादेव जानकर यांनी या संत संमेलनाचे ठराव दोन दिवसांनंतर होणाऱ्या मंत्री मंडळाच्या बैठकीत मांडून मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करील, असे आश्वासन दिले़ संत संमेलना दरम्यान दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले़ यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते़
परभणीत जानकर यांच्या हस्ते संत संमेलनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 1:11 AM