कोरोनाच्या संकट काळात गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना कमी झाल्या होत्या. मात्र अनलॉक होताच या घटनांनी आता डोके वर काढले आहे. पेट्रोल पंपावर घडलेल्या घटनेनंतर तर नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
येथील शनिवार बाजार भागातील भिकूलाल पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक अब्दुल सत्तार शेख नबी हे २१ जूनरोजी रात्री दिवसभरात पेट्रोल पंपावर जमा झालेली १ लाख ५० हजार रुपयांची रक्कम एका बॅगमध्ये टाकून त्यांच्या घरी निघाले होते. तेवढ्यात मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना हिसका देऊन बॅग पळविली. याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे या घटनेचा तपास करीत आहेत. शहरातील मध्यवस्तीत ही घटना घडल्याने नागरिकांत धास्ती निर्माण झाली आहे.
दोन दिवसांपूर्वीच मानवत येथील एका वाहनचालकाला लुटल्याची घटना घडली आहे. मानवत तालुक्यातील वाणी येथील वाहनचालक विजय शिवमूर्ती लुंगारे हे कामानिमित्त परभणीत आले होते. भूक लागल्याने त्यांना हॉटेलमध्ये जायचे होते. एका रिक्षात बसून ते हॉटेलकडे निघाले तेव्हा रिक्षाचालकाने एका बोळीत नेले. तेथे लुंगारे यांना मारहाण करून त्यांच्याजवळील १९ हजार ७०० रुपये दोघांनी पळविले. तसेच बसस्थानक परिसरात एका प्रवाशाला तिघांनी अडवून त्याच्याजवळील पाचशे रुपये आणि एक मोबाईल हिसकावून घेण्याची घटना चार दिवसांपूर्वीच घडली आहे. चार दिवसांत लुटीच्या तीन घटना घडल्या असून, या घटनांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.
चोरटे सीसीटीव्हीत जेरबंद
शनिवार बाजार भागातील पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाचे दीड लाख रुपये लुटणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जेरबंद झाले आहेत. या घटनेच्या तपासासाठी दोन पथके नियुक्त केली असून, लवकरच चोरटे हाती लागतील, असे नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी सांगितले.
सव्वालाखांचे दागिने घेऊन नोकराचा पोबारा
सोने उजळवून देण्यासाठी आलेले १ लाख ४१ हजार रुपयांचे दागिने घेऊन नोकराने पळ काढल्याची घटना १९ जूनरोजी घडली. या प्रकरणात सोमवारी रात्री नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील भोईगल्ली भागात शेख मुख्त्यार हुसेन शेख मैनोद्दीन हे कारागीर असून, सोने उजळवून देतात. त्यांच्याकडे शेख जकीर अली शेख अन्सार हा नोकर होता. दोघेही पश्चिम बंगालचे मूळचे रहिवासी आहेत. १९ जूनरोजी शेख मुख्त्यार यांच्याकडे सोने उजळून देण्यासाठी ३० ग्रॅम सोने देण्यात आले. हे सोने शेख मुख्त्यार यांनी ड्रॉव्हरमध्ये ठेवले होते. शेख मुख्त्यार यांची नजर चुकवून शेख जकीर अली शेख अन्सार याने सोने घेऊन रात्री १०.४५ च्या सुमारास तेथून पळ काढला. याप्रकरणी शेख मुख्त्यार यांच्या फिर्यादीवरून शेख जकीर अली ,शेख अन्सार याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक मारोती चव्हाण या प्रकरणाचा तपास करीत आहेत.