परभणी : कार्तिकी एकादशीनिमित्त दक्षिण मध्य रेल्वे विभागाने ३ विशेष रेल्वे गाड्यांच्या सहा फेऱ्या पंढरपूरला सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे या कालावधीत मराठवाड्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वे विभागातून बिदर -पंढरपूर (०७५१७) ही रेल्वे २२ नोव्हेंबर रोजी बिदर येथून रात्री १०.१५ वाजता निघून पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२० वाजता पोहोचेल. तसेच पंढरपूर -बिदर (०७५१८) ही रेल्वे २३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता पंढरपूर येथून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ४:३० वाजता बिदर येथे पोहोचणार आहे. आदिलाबाद पंढरपूर (०७५०१) ही रेल्वे २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता आदिलाबाद येथून निघून पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७:३० वाजता पोहोचेल. पंढरपूर- आदीलाबाद (०७५०२) ही रेल्वे २७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता पंढरपूर येथून निघून दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता आदीलाबाद येथे पोहोचेल.
त्याचप्रमाणे पंढरपूर -नांदेड (०७५३१) ही रेल्वे २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:१५ वाजता पंढरपूर येथून निघून रात्री ८:४० वाजता नांदेड येथे पोहोचेल. तर नांदेड -पंढरपूर (०७५३२) ही रेल्वे २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:२० वाजता नांदेड येथून निघणार असून दुसरे दिवशी सकाळी ७:३० वाजता पंढरपूर येथे पोहोचणार आहे. विशेष म्हणजे, या सर्व रेल्वे गाड्यांचे कोचेस विना आरक्षित राहणार आहेत. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे राज्यभरातून वारकरी येतात. या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.