गंगाखेड तालुक्यात गतवर्षी १७ मे रोजी पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यानंतर तालुक्यात डिसेंबर २०२० अखेरपर्यंत ७३३ कोरोनाबाधित आढळले. गतवर्षी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी नगरपालिका, आरोग्य विभाग, महसूल विभाग, जिल्हा परिषद आदींच्या वतीने नियोजन करीत संशयित कोरोना रुग्णांना क्वॉरंटाइन करण्यात येत होते. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. १४ फेब्रुवारीपासून गंगाखेड तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्यास सुरुवात झाली. गेल्या ५४ दिवसांत तालुक्यात ३५२ बाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारासाठी तालुक्यात रुग्णालये सुरू नसल्याने नाइलाजाने अनेक जण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. १३ मार्च रोजी कस्तुरबा गांधी विद्यालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असले तरी अनेक जण घरीच उपचार घेत आहेत. गतवर्षीप्रमाणे त्यांच्या घराचा परिसर आता मात्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला जात नाही. किंवा रुग्ण आढळलेल्या व्यक्तीच्या घरावर कुठल्याही प्रकारची सूचना लावली जात नाही. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती शहरात किंवा गावांत फिरतात. त्यांनी तपासणीच्या अनुषंगाने स्वॅब दिल्यानंतरही आरोग्य विभागाकडून अहवाल मिळण्यास मोठी दिरंगाई होत आहे. त्यातून संशयित काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यास इतरांनाही त्याची लागण होत आहे. त्यामुळे एक तर आरोग्य विभागाने संशयितांचे अहवाल दुसऱ्या दिवशीच द्यावेत किंवा संशयित व्यक्तींना क्वाॅरंटाइन करावे, अशी मागणी होत आहे.
आतापर्यंत १ हजार ८५ जणांना कोरोना
गंगाखेड तालुक्यात १७ मे २०२० ते ८ एप्रिलपर्यंत १ हजार ८५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ९३३ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर ६२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. अन्य ४५ रुग्णांवर परभणी, लातूर, औरंगाबाद, नांदेड आदी ठिकाणच्या खासगी व शासकीय रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ३८५ जणांचा अहवाल प्रलंबित आहे.