रस्त्याच्या कडेला साचला कचरा
परभणी : शहरातील विसावा कॉर्नर आणि जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या परिसरात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. या ठिकाणी कचराकुंडीची सुविधा नसल्याने रस्त्यावरच कचरा टाकला जात आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मनपा कर्मचाऱ्यांनी या भागातील कचरा उचलून घ्यावा, तसेच या भागात कचराकुंडीची सुविधा निर्माण करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
शहरातील उद्यानांची दुरवस्था
परभणी : शहरातील राजगोपालाचारी उद्यानासह सर्वच उद्यानांची दुरवस्था झाली आहे. राजगोपालाचारी उद्यानातील खेळण्या मोडकळीस आल्या आहेत. त्याचप्रमाणे नेहरू पार्क, शिवाजी पार्क या दोन उद्यानांची बकाल अवस्था झाली असून, गांधी पार्क भागातही मोठ्या प्रमाणात विकास कामे शिल्लक आहेत. उद्यानांतील रखडलेली कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
बसस्थानकातील बसपोर्टचे काम बंदच
परभणी : येथील बसस्थानक परिसरात बसपोर्ट उभारणीचे काम दोन महिन्यांपासून बंद आहे. बसपोर्टसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे; मात्र महामंडळ प्रशासनाने कंत्राटदाराचे पूर्वीचे देयक अदा केले नसल्याने काम बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हे काम मुदतीत पूर्ण होण्याची शक्यता आता मावळली आहे.
गव्हाणे चौकातील कारंजे बंदच
परभणी : शहरात सुशोभिकरण करण्यासाठी गव्हाणे चौकात कारंजे उभारण्यात आले; मात्र या कारंजाची व्यवस्थित देखभाल, दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे हे कारंजे मागील काही दिवसांपासून बंद आहेत. मध्यंतरी आठवडाभर हे कारंजे सुरू करण्यात आले होते; मात्र पुन्हा पूर्वीप्रमाणेच कारंजे बंद ठेवण्यात येत आहेत, त्यामुळे कारंजावर केलेला खर्च वाया गेला आहे.
अरुंद रस्त्यांवर जड वाहनांचा शिरकाव
परभणी : शहरातील रस्त्यांवर सर्रास जड वाहने नेली जात आहेत. त्यामुळे वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत आहे. विशेष म्हणजे जड वाहनांना शहरातील बाजारपेठ भागातील रस्त्यांवरून प्रवेश बंदी असतानाही या नियमांचे उल्लंघन केले जाते. जेल कॉर्नरपासून ही वाहने थेट अपना कॉर्नर आणि पुढे ग्रॅण्ड कार्नर मागे स्टेडियम परिसराकडे आणली जातात. त्यामुळे अनेक वेळा वाहतुकीचा खोळंबा होत आहे.