परभणी : लोकसहभागाशिवाय गावाचा विकास शक्य नाही. त्यामुळे ग्राम स्वच्छता आणि विकासाच्या मोहिमेत लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले.
जिल्हा परिषद आणि साद माणुसकीची फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने १८ सप्टेंबर रोजी साद ग्रामच्या वाटेवर असलेल्या ९ ग्रामपंचायतींतील सरपंच आणि ग्रामसेवकांसमवेत संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी टाकसाळे बोलत होते. कार्यक्रमास साद माणुसकीची फाऊंडेशनचे संचालक हरिष बुटले, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, सहायक निबंधक नानासाहेब कदम, स्वच्छ भारत मिशनचे संवाद तज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड, आप्पा वडीकर यांची उपस्थिती होती. यावेळी सहायक निबंधक नानासाहेब कदम यांनी ग्रामीण भागात विकासात्मक कामे करताना येणाऱ्या अडचणींवर कशा पद्धतीने उपाययोजना करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी वडी (ता. पाथरी), देऊळगाव गात (ता. सेलू), निळा (ता. सोनपेठ), मांडाखळी (ता. परभणी), नावकी (ता. पूर्णा), निवळी (ता. जिंतूर), पुयनी (ता. पालम), रामपुरी बु. (ता. मानवत), नरळद (ता. गंगाखेड) या गावांतील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
उघड्यावरची हागणदारी बंद करणे, सांडपाणी जमिनीत जिरवणे, शाळा, अंगणवाडीमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करणे, स्त्रीभ्रूण हत्या थांबवणे, वृक्ष लागवड करणे, दारू बंदी अशी विविध कामे लोकसहभागातून करण्याचे आवाहन टाकसाळे यांनी केले. सहायक सहकार अधिकारी बी. सी. लिंगायत यांनी सूत्रसंचालन केले. स्वच्छ भारत मिशनचे संवादतज्ज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्याण लोहट, शिवाजीराव कुटे, माधव चांदणे, नागेश शिराळ, कृष्णा कानडे, विशाल यादव, माणिक सोळंके, प्रा. सुरेश खिस्ते, प्रताप शिंदे, संजय चिंचाणे आदींनी प्रयत्न केले.