जिल्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा ऑनलाईन सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे या माध्यमातूनच घ्यावे, लागत आहेत. इतर कुठलाही पर्याय नसल्याने पालक नाईलाजाने का होईना यासाठी आर्थिक भार उचलत आहेत. ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मोबाईल किंवा टॅब किंवा लॅपटॉप घेणे अनिवार्य आहे. यासोबतच यासाठी इंटरनेट जोडणी आवश्यक आहे. त्यासाठी जवळपास ३० ते ३५ हजारांचा खर्च वाढला आहे. कोरोनामुळे अगोदरच अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशात ऑनलाईन शिक्षणासाठी लागणाऱ्या साधनांची जुळवाजुळव करताना सर्वसामान्य पालक हैराण झाले आहेत. अशातच विद्यार्थ्यांना जास्तवेळ स्क्रीनवर जात असल्याने डोळ्यांच्या समस्या येत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ऑफलाईन शिक्षणाची आस लागली आहे.
मोबाईल किंवा संगणक आणि इंटरनेट
n ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल किंवा संगणक किंवा टॅब आवश्यक आहे. या साधनांसाठी जवळपास ३० ते ३५ हजारांचा पालकांना खर्च येत आहे शिवाय इंटरनेटचे दर महिन्याला रिचार्ज करणे आवश्यक आहे.
n यासोबतच विद्यार्थ्यांना शाळेतील फी पूर्णपणे भरावी लागत आहे. न्यायालयाने कोरोनाकाळातील फी कमी करण्याचा सर्व व्यवस्थापनांना आदेश देऊनही काही शाळा या आदेशाची अंमलबजावणी करत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांकडून पूर्ण फी घेतली जात आहे. त्यामुळे पालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे दोन वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. घरी मुलांसाठी मोबाईल नव्हता. त्याच्यासाठी मोबाईल घेतला. त्यानंतर आता या मोबाईलसाठी प्रत्येक महिन्याला दीडशे रुपयांचा इंटरनेट खर्च वाढला आहे. तसेच हेडफोन व इतर खर्चही वाढला आहे. ऑफलाईन शाळा असती तर खर्च टळला असता.
- पुंडलिक गायकवाड, पालक
विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे लागत आहे. त्यासाठी नवीन मोबाईल खरेदी करावा लागला. पूर्वी मुलांच्या हातात मोबाईल दिला जात नव्हता. मात्र, ऑनलाईन शिक्षणासाठी तो द्यावा लागत आहे. त्यातून प्रत्येक महिन्याच्या इंटरनेट खर्चाचीही भर पडली आहे. मागील दोन वर्षांपासून शिक्षणासाठी हा खर्च वाढला आहे.
- अशोक सोळंके, पालक
मुलांचे होतेय नुकसान
खरंतर कोरोनाच्या संसर्ग काळातही मुलांना घरी बसून शिक्षण मिळतेय ही खूप मोठी गोष्ट आहे. मात्र, त्यात काही डिसॲडव्हांटेजही आहेत. ग्रामीण भागात छोट्या स्क्रीनवर सतत राहून अभ्यासात कॉन्स्ट्रेट करावे लागते. स्क्रीनचा वापर वाढल्याने मुलांच्या नजरेवर परिणाम होऊ शकतो. तसेच इतर दुष्परिणामही होतात.
- डाॅ.सुभाष काळे, मानसोपचार तज्ज्ञ