परभणी : गाडीला धक्का लागला किंवा अन्य कारणावरून भर रस्त्यावर वाद घालून लूट करण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. जिल्ह्यात मागील काही दिवसांत अशा पद्धतीने लुटीचे प्रकार होत आहेत.
शहरातील वसमत रस्त्यावर चार दिवसांपूर्वीच गाडीवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीची पैसे असलेली पिशवी हिसकावून १ लाख ८० हजार रुपयांची रक्कम पळविल्याची घटना घडली होती. तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन संबंधित व्यक्तीसोबत वाद घालणे आणि त्याला भांडणांमध्ये गुंतवून त्याच्याजवळील रक्कम हिसकावून घेण्याचे प्रकार बसस्थानक, रेल्वेस्थानक भागात घडत आहेत.
त्याचप्रमाणे ऑटोरिक्षामध्ये बसून प्रवास करीत असताना अनोळखी प्रवासी महिलांची दागिने लुटल्याचे प्रकार शहरात घडले आहेत. गंगाखेड रोड, नांदखेडा रोड या भागातील दोन प्रकार ताजे आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोणाशी विनाकारण वाद घालणे तसेच अनोळखी व्यक्तीसोबत संवाद साधणे धोकादायक ठरू शकते. नागरिकांनी स्वत:हून या संदर्भात काळजी घेतल्यास अशा प्रकारांमधून त्यांची सुटका होऊ शकते.
असे तुमच्याही बाबतीत घडू शकते
शहरातील बाजारपेठ भागात मागील काही दिवसांपासून दागिने लांबविण्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषत: महिलांच्या बाबतीत असे लुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे महिलांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
खरेदीच्या निमित्ताने बाजारपेठेत आलेल्या महिला खरेदीमध्ये व्यस्त असताना त्यांच्याजवळील पर्स हिसकावणे, दागिने लांबविणे असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे अनोळखी व्यक्तींपासून शक्य तो दूर राहून काळजी घ्यावी.
महिलेचे दागिने लुटले
जिंतूर रोडहून ऑटोरिक्षाने नांदखेडा रोडकडे प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधील दागिने काही महिलांनी लांबविल्याची घटना १५ ते २० दिवसांपूर्वीच घडली आहे तसेच एका वृद्ध महिलेला मारहाण करून दागिने लुटल्याची घटना गंगाखेड रोड भागात घडली.
काय काळजी घ्याल?
सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी सतर्क असले पाहिजे. कोणाबद्दल संशय येत असेल तर जवळच्या पोलीस ठाण्यास ही माहिती देणे आवश्यक आहे. तसेच विनाकारण वाद टाळावा.