बसपोर्टचे काम निधीअभावी रखडले
परभणी : बस स्थानकावरील बसपोर्ट उभारण्याचे काम निधीअभावी रखडले आहे. विशेष म्हणजे, काम सुरू होण्यापूर्वी शासनाने निधी उपलब्ध करून दिला होता, परंतु या निधीचा पुरवठा केला जात नाही. एस.टी. महामंडळ प्रशासन निधी उपलब्ध करून देण्यास उदासीन असल्याने, सध्या काम ठप्प पडले आहे.
बंद सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी
परभणी : शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी दहा ते पंधरा वर्षांपूर्वी महानगरपालिकेने चौकाचौकात सिग्नल बसविले होते. सध्या सिग्नल बंद असल्याने केवळ ते शोभेचे झाले आहेत. शहरातील वाढलेली वाहतूक लक्षात घेता, सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करावी, अशी वाहनधारकांची मागणी आहे.
विद्यापीठातील रस्त्यांची दुरवस्था
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या भागातील रस्ते उखडल्याने वाहनधारकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. कृषी विद्यापीठाच्या पलीकडील बाजूस अनेक छोट्या गावांतील ग्रामस्थ परभणी शहरात येण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. ग्रामस्थांसह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना खराब रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्यावरील खड्डा बनला धोकादायक
परभणी : खंडोबा बाजार भागातून ता धाररोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर मधोमध खड्डा पडला असून, हा खड्डा वाहनधारकांसाठी धोक्याचा ठरत आहे. महानगरपालिका प्रशासनाने खड्डा बुजवावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन
परभणी : शहरातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढली आहे. सकाळी दहा वाजेपासून नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडत असून, बाजारपेठ भागांमध्ये फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
प्रवासी निवाऱ्यांना आली अवकळा
परभणी : शहरातील वसमत रस्त्यावर एसटी महामंडळाने उभारलेल्या प्रवासी निवाऱ्यांना अवकळा आली आहे. प्रवासी निवाऱ्याच्या ठिकाणी अतिक्रमण झाले असल्याने, प्रवाशांना थांबण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही. महामंडळाने याकडे लक्ष द्यावे, अशी प्रवाशांची मागणी आहे.