परभणी : कोरोनाच्या संसर्गकाळात जिल्ह्यातील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण घटल्याची बाब प्रकर्षाने समोर आली आहे. त्यासाठी वेगवेगळी कारणे समोर येत आहेत.
जिल्ह्यात सर्वसाधारपणे अपघाती आणि गंभीर आजाराने मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. या काळात कोरोनाच्या आजारामुळे नागरिकांमध्ये स्वत:च्या आरोग्याविषयी जागरुकता निर्माण झाली. विशेषत: पूर्वीपेक्षाही अधिक काळजी मुलांच्या बाबतीत घेण्यात आली. त्याचा परिणाम मृत्यूचे प्रमाण घटण्यात झाला आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद होती. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही घटले. याशिवाय शहरातील अंतर्गत वाहतूकही कमी असल्याने घरासमोर खेळणारी किंवा मुख्य रस्त्यालगत भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे बालकांचे होणारे मृत्यू जवळपास शून्यावर आले आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ३०७ नागिरकांचा मृत्यू झाला. त्यात १४ वर्षांच्या आतील केवळ एका बालकाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गामुळे मुलांच्या मृत्यूचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. एकंदर कोरोनाकाळात जिल्ह्यातील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण घटले आहे.
मुलींच्या मृत्यूची कारणे
मुलांमध्ये प्रतिकारक्षमता अधिक असते. त्यामुळे मुलांच्या मृत्यूचे प्रमाण कमीच असते. त्यातही एखादा आजार जडला, त्यावर वेळेत उपचार झाले नाही तरच मृत्यूची शक्यता असते.
मास्क वापराने आरोग्य अबाधित
लॉकडाऊन काळात कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला होता. मुले शक्यतो घराबाहेर पडली नाहीत. अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा कटाक्षाने वापर झाला. त्यामुळे कोरोना वगळता इतर संसर्गजन्य आजाराचे प्रमाणही कमी राहिले आहे. त्यामुळे कोरोनाबरोबरच इतर आजारांपासूनही मुलांचे संरक्षण या काळात झाले.