बांधकाम साहित्याचा अडथळा वाढला
परभणी : शहरात ठिकठिकाणी बांधकाम साहित्य रस्त्यावरच टाकले आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा या साहित्यामुळे वाहनांना किरकोळ अपघातही होत आहेत. रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवणाऱ्या नागरिकांवर मनपा प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सार्वजनिक हातपंप बंद अवस्थेत
परभणी : शहरातील विविध प्रभागातील सार्वजनिक हातपंप बंद अवस्थेत आहेत. जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असून, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, या हातपंपांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. हातपंपांना पुरेसे पाणी असतानाही केवळ हातपंपाचे साहित्य नसल्याने हे हातपंप बंद आहेत. हे सार्वजनिक हातपंप दुरुस्त केल्यास नागरिकांना उन्हाळ्यातील टंचाईपासून दिलासा मिळू शकतो.
प्रशासनाच्या नियमांचे नागरिकांकडून उल्लंघन
परभणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करण्याचे नियम प्रशासनाने घालून दिले आहेत. मात्र, अनेक नागरिक या नियमांचे पालन करत नाहीत. स्थानिक संस्थांकडून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, तरीही हा प्रकार कमी होत नाही. तेव्हा मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांना लावला जाणारा दंड वाढवावा, अशी मागणी होत आहे.
नारायणचाळ रस्त्याची दुरवस्था
परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीपासून नारायणचाळीत जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हा रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, आधीच हा रस्ता अरुंद असून, त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच खड्ड्यांची भर पडल्याने वाहनधारक त्रस्त आहेत.
ज्वारीच्या काढणीला सुरुवात
परभणी : रबी हंगामातील ज्वारीचे पीक काढणीला आले असून, ग्रामीण भागात या कामांना वेग आला आहे. या वर्षी जिल्ह्यात ज्वारीचा पेरा वाढला आहे. त्यातच वेळेवर पाणी मिळाल्याने उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. सध्या काढणीचे काम गतीने सुरू आहे.
शहरातील पोलीस चौकी बंद
परभणी : शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या पोलीस चौकी मागील काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. पोलीस चौकी सुरू केल्यास शहरातील गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांना आळा बसू शकेल. त्याचप्रमाणे, नागरिकांना तक्रारी करण्यासाठीही दूर अंतरावर जाण्याऐवजी चौकी सोयीचे ठरणार आहे.
बस स्थानकावर तपासणीला खो
परभणी : येथील बस स्थानकावर नागरिकांची तपासणी होत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक नागरिकांच्या तपासण्या करण्याचे आदेश दिले असताना, त्याकडे फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.