२०२०-२१ या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. पेरणी केलेल्या पिकांवर हजारो रुपयांचा खर्च केला. मात्र काढणीस आलेले पीक अवकाळी पावसाने क्षतीग्रस्त झाले. परिणामी शेतकरी अडचणीत सापडला. रब्बी हंगामातही पीक कर्ज व उसनवारी करून पेरणी केलेली पिके बहरली; मात्र १८ व १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, तर दुसरीकडे आता रासायनिक खतांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे पेरणीचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.
मशागतीचे दरही वाढले
डिझेलचे दर वाढल्याने यंत्राच्या साहाय्याने केली जाणारी मशागतही महागली आहे. नांगरणी, कोळपणी, पाळी, रोटावेटर, गहू, ज्वारी, हरभरा काढणीचे दर ५०० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
१ लाख २० हजार मेट्रिक टन खताची गरज
परभणी जिल्ह्यात कृषी विभागाच्या नियोजनानुसार दरवर्षी जवळपास ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी पिकांची पेरणी केली जाते. या पिकांच्या वाढीसाठी २०२०-२१ या खरीप हंगामात जिल्ह्याला १ लाख १० हजार ६५१ मेट्रिक टन खताची विक्री झाली होती. त्या अनुषंगाने यावर्षीही १ लाख २० हजार मेट्रिक टन खताची गरज आहे. मात्र एका गोणीमागे अडीचशे रुपये शेतकऱ्यांना जास्तीचे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांना रासायनिक खत मोफत द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
कोरोनामुळे शेतीमालाला भाव मिळत नाही. उत्पादनावर केलेला खर्चही निघत नाही, तर दुसरीकडे रासायनिक खताच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ करत शेतकऱ्यांची खत कंपन्यांकडून पिळवणूक सुरू आहे.
- नरसिंग ढेंबरे, शेतकरी
खरीप हंगामात बहरलेली पिके अतिवृष्टीच्या तडाख्यात वाहून गेली. त्यातच आगामी खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खताच्या प्रत्येक गोणीमागे अडीचशे रुपयांची वाढ करून आर्थिक कोंडी करण्यात येत आहे.
- माणिक कदम, शेतकरी
रब्बी हंगामात हजारो रुपयांचा खर्च करून पिके वाढविली. मात्र फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळीने पिकांचे नुकसान झाले. या पिकांची मदत मिळाली नाही, तर दुसरीकडे खताचे भाव वाढवून जखमेवर मीठ चोळले जात आहे.
- विलास साखरे, शेतकरी