लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : देशात सर्वाधिक महाग पेट्रोलपरभणीकरांना खरेदी करावे लागत असून इंधन दरवाढीमुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने परभणीकर चांगलेच धास्तावल्याचे दिसून येत आहे़पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने महागाईच्या झळा सर्वसामान्यांना चांगल्याच बसू लागल्या आहेत़ यामध्येच देशात सर्वाधिक पेट्रोल व डिझेलचे दर परभणीमध्ये असल्याने इतर शहरांच्या तुलनेत परभणीकरांचा खिसा अधिकचा खाली होवू लागला आहे़ मंगळवारी परभणी शहरात भारत पेट्रोलियमच्या पंपावर पेट्रोलचा दर ९२़०७ रुपये तर डिझेलचा दर ७९़२७ रुपये प्रती लिटर होता़ हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपावर पेट्रोल ९२़०५ रुपये तर डिझेल ७९़२५ रुपये प्रतिलिटर होते़ इंडियन आॅईलच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल ९१़९६ रुपये तर डिझेल ७९़१७ रुपये प्रतिलिटर दराने विक्री झाले़ देशभरात बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलचे दर ९१ रुपयांच्या घरात असताना परभणीत मात्र ते ९२ रुपयांच्या घरात गेल्याने महागाईची तीव्रताही वाढू लागली आहे़ परिणामी आता शहरातील वाहतुकीच्या दरांमध्येही आॅटोचालकांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे़ पूर्वी बसस्थानक, रेल्वेस्थानकापासून देशमुख हॉटेल, काळी कमान, वसमत रोड, जिंतूर रोड आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रती व्यक्ती १० रुपये भाडे आकारले जात होते़ आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे़ प्रती व्यक्ती १५ रुपये ग्राहकांकडून आॅटो चालक घेत असल्याने प्रवासी चांगलेच हैराण झाले आहेत़ प्रवासी वाहतुकीचे दर वाढल्यानंतर आता बाजारातील भाजीपाल्याचे दरही वाढण्याची शक्यता आहे़ शिवाय ट्रान्सपोर्ट चालकांकडूनही भाडेवाढ होण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्य नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत़ त्यामुळे केंद्र शासनाने इंधन दरवाढीवर आळा घालून इंधनाचे दर जीएसटीमध्ये आणावेत, अशी मागणी आता नागरिकांमधून होवू लागली आहे़अकोल्यातून इंधन मागविल्यास फायदापरभणी शहराला ३३० किमी अंतरावर असलेल्या मनमाड येथील तेल डेपोतून पेट्रोल व डिझेलचा पुरवठा होतो़ मराठवाड्यात कोठेही इंधन साठविण्याचा डेपो नाही़ नांदेड शहराला अकोला येथील डेपोतून इंधनाचा पुरवठा होतो़ त्यामुळे परभणीपेक्षा नांदेड येथील पेट्रोल, डिझेलचे दर कमी आहेत़ परभणी येथील वितरकांनी २०१ किमी अंतरावर असलेल्या अकोला येथील तेल डेपोतून पेट्रोल, डिझेल मागविल्यास निश्चितच इंधनाचे दर काही अंशी तरी कमी होतील; परंतु, या संदर्भात पुढाकार घेणार तरी कोण? असा सवाल उपस्थित होत आहे़ जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते मंडळी व अधिकाऱ्यांनी या प्रश्नी पुढाकार घेणे आवश्यक आहे; परंतु, तसे होताना दिसून येत नाही़ शिवाय बहुतांश परभणीकरही देशात सर्वाधिक पैसा मोजून पेट्रोल, डिझेलची खरेदी करीत चुप्पी साधून आहेत़महिनाभरात ३० रुपयांनी गॅस महागएकीकडे पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना घरगुती वापराच्या गॅसच्या दरामध्येही सातत्याने वाढ होत आहे़ परभणीत ८४७़५० रुपये प्रती १४ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना मोजावे लागत आहेत़ यापूर्वी एप्रिल ते सप्टेंबर या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल १७१़५० रुपयांनी प्रती सिलिंडर महाग झाला आहे़ एप्रिल महिन्यात १४ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी ६७६ रुपये मोजावे लागत होते़ मे महिन्यात यामध्ये थोडीची कपात होवून ६७४़५० रुपये गॅस सिलिंडरचा दर झाला़ त्यानंतर जून महिन्यात ७२३ रुपये, जुलै महिन्यात ७८१़५० रुपये, आॅगस्ट महिन्यात ८१७ रुपये आणि आता सप्टेंबर महिन्यात ८४७़५० रुपये प्रति सिलिंडर झाले आहेत़ गॅस सिलिंडरच्या सततच्या वाढत्या दरामुळे गृहिणींचे बजेटही कोलमडले आहे़
महागाईच्या भडक्याने परभणीकर त्रस्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:34 AM