५० कि.मी. सायकलिंग राइड
परभणी : येथील पेडल मार्ग सायकलिस्ट संघटनेच्या वतीने विज्ञान दिवसानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गंगाखेड रस्तामार्गे उमरी रस्त्यापर्यंत ५० कि.मी.ची सायकल राइडचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गोविंद निरस, विक्रम शिंदे, दीपक तळेकर, वरुण भंडारवाड, रुद्र वट्टमवार, सुनील बागल, संजय शिंदे, संतोष चव्हाण, नितीन चव्हाण, पवन तपसे, संजय देशमुख, शंकर फुटके, किशोर शिंदे यांनी सहभाग नोंदविला.
दोन वर्षांनंतर मिळाले पीककर्ज
ताडबोरगाव : मानवत तालुक्यातील देवलगाव आवचार येथील शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून एकही बँक दत्तक म्हणून स्वीकारण्यास तयार नसल्याने गावातील शेतकऱ्यांना पीककर्जापासून वंचित रहावे लागत होते. रयत क्रांती संघटनेच्या पाठपुराव्यानंतर बँक ऑफ बडोदाकडे हे गाव दत्तक देण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीककर्जाचे वाटप करण्यात आले. यावेळी त्र्यंबक आवचार, पांडुरंग आवचार, नारायण आवचार, ज्ञानोबा आवचार, सतीश आवचार, तुकाराम आवचार, सोपान जाधव, परमेश्वर आवचार उपस्थित होते.
हरभऱ्याची गंजी जळाली
पूर्णा : परभणी तालुक्यातील नांदगाव शिवारातील शेतामध्ये रचून ठेवलेली हरभऱ्याची गंजी अज्ञात इसमाने जाळल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी पहाटे उघडकीस आली. या घटनेत ८१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नांदगाव येथील मुंजाजी नानासाहेब भालेराव यांच्या शेतात १८ क्विंटल हरभऱ्याची गंजी शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात इसमाने नुकसान करण्याच्या हेतूने जाळली. या घटनेत ८१ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास अर्जुन रणखांब हे करीत आहेत.
कोरोना जनजागृती
पूर्णा : कोरोना प्रतिबंधाबाबत कलापथकांकडून २७ फेब्रुवारी रोजी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात जनजागृती करण्यात आली. पूर्णा येथील शाहीर विजय सातोरे यांच्या कलाविष्कार कला मंचच्या वतीने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर कोरोना लसीकरण, आत्मनिर्भर भारत, शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमाची जनजागृती करण्यात आली. या कलापथकात विजय सातोरे, भीमराव राऊत, मोहन भुसावळे, सखाराम भिसे, अरुणा सावते, घनश्याम थोरात आदींचा सहभाग होता.