याबाबत माहिती अशी, गडचिरोली येथील गोकुळनगर भागातील बाबूराव काठवे यांच्या नातेवाइकांना निनावी नंबरवरून फोन आला होता. सदरील व्यक्तीने परभणी येथून बोलत असल्याचे त्यांना सांगितले. आम्हाला सहा-सात किलो सोन्याचा हंडा सापडला आहे. त्यापैकी एक किलो सोने जर तुम्ही विकून दिले तर तुम्हाला पन्नास ग्राम सोने दिले जाईल, असे या भामट्याने काठवे यांच्या नातेवाइकांना सांगितले. नातेवाइकांनी ही माहिती बाबूराव काठवे यांना दिली. त्यानुसार बाबूराव काठवे यांनी सदरील व्यक्तीशी संपर्क साधून सोन्याबाबत विचारणा केली. तीस हजार रुपये तोळा या दराने सोने असून एक किलो सोने विकून दिल्यास ५० ग्राम सोने दिले जाईल, असे काठवे यांना संबंधिताने सांगितले. त्यानंतर बाबूराव काठवे हे १५ मार्च २०२१ रोजी सकाळी ७ वाजता चारचाकी वाहन घेऊन सोने खरेदीसाठी परभणीकडे निघाले. तेव्हा त्यांना वाटेतच आरोपींनी फोन करून लोहा येथे येण्यास सांगितले. त्यामुळे काठवे व त्यांच्यासोबतचे इतर काहीजण लोहा येथे जाण्यासाठी निघाले. लोहा येथे पोहोचल्यानंतर १६ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास आरोपींनी त्यांना गंगाखेडच्या पुढे येण्यास सांगितले. त्यानुसार काठवे दत्तवाडी शिवारात पोहोचले. त्यावेळी दोन पुरुष व दोन महिला त्या ठिकाणी उभ्या होत्या. बाबूराव काठवे गाडीतून खाली उतरताच त्यांना एका महिलेने बनावट सोने दाखवले. हे सोने बनावट असल्याने काठवे यांनी ते घेण्यास नकार दिला व ते गाडीत बसण्यासाठी निघाले. त्याचवेळी इतर दोघांनी त्यांना पकडून मारहाण केली. आरोपींनी काठवे यांच्या गाडीची झडती घेऊन १ लाख ४० हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी बाबूराव काठवे यांच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात १ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, पोलिसांनी पोलिसी कसब वापरत फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनावरून अवघ्या चार तासांत आरोपीसह रोख रक्कम हस्तगत केली होती.
फिर्यादीच्या वर्णनावरून आरोपी चार तासांत जेरबंद
गडचिरोली येथून आलेल्या फिर्यादी बाबूराव काठवे यांनी आरोपीचे वर्णन पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दत्तवाडी, शंकरवाडी, पोहंडूळ, शिवाजीनगर तांडा येथील शिवारात चौकशी केली. त्यावरून पोलिसांना काळूबाई शिंदे व रेखा काळे यांच्यावर संशय आला. त्यावरून काळुबाई शिंदे व रेखा काळे यांचा शोध घेतला असता दत्तवाडी शिवारातील आखाड्यावरून पोलिसांनी त्यांना त्याच दिवशी अटक केली. त्यांची सोनपेठ येथील पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करून पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला व त्यांच्यासह इतर दोन पुरुष सहआरोपी असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींना सोनपेठ येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.
लुटलेले १ लाख ४० हजार हस्तगत
यामध्ये आरोपींकडून फिर्यादीचे लुटलेले १ लाख ४० हजार रुपये व १ मोबाइल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने, प्रवीण सोमवंशी, पोलीस कर्मचारी महेश कवठाळे, आनंद कांबळे, किरण काळे व जयश्री मुंडे आदींनी केली.