समग्र शिक्षा अभियान अंतर्गत १ ते ८ पर्यंत एसी, एसटी, बीपीएल प्रवर्गातील विद्यार्थी, तसेच सर्व विद्यार्थिनींना मोफत गणवेश वाटप केला जातो. कोविड १९ मुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. आता इयत्ता ५ ते १२ च्या शाळा सुरू झाल्या आहेत. १ ते ५ पर्यंतच्या शाळा मार्चमध्ये सुरू होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
शिक्षण विभागाकडून शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपासंदर्भात अद्याप निधी उपलब्ध झाला नसला तरी यावर्षी २ ऐवजी १ गणवेश दिला जाणार असल्याने कोविड १९ चा फटकाही या योजनेला बसला आहे. गतवर्षी पात्र विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यात आले होते. यावर्षी एकच मिळणार असल्याने विद्यार्थांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
नऊ हजार विद्यार्थांना बसणार फटका
पाथरी तालुक्यातील इयत्ता १ ते ८ वी पर्यंत शाळेतील ८ हजार ९२४ लाभार्थी विद्यार्थी आहेत. यामध्ये २ हजार २६० विद्यार्थी आणि ६ हजार ६६४ विद्यार्थिनींचा समावेश आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे पाथरी तालुक्यातील नऊ हजार विद्यार्थांना फटका बसणार आहे.
आता सर्वच शाळा सुरू होत आहेत. शाळेतील पात्र विद्यार्थ्यानुसार मागणी करण्यात आली आहे. एका गणवेशासाठी शासनाकडून प्रति विद्यार्थी ३०० रुपये मिळणार आहेत.
मुकेश राठोड, गटशिक्षणाधिकारी, पाथरी.