पाथरी ( परभणी) : येथील पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेचे पोलीस जमादार अन्सारी यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर पोलीस निरीक्षकांनी अपमानित केल्याने आत्महत्या करावीशी वाटते असे स्टेटस ठेवून मोबाईल बंद केला. या घटनेमुळे पाथरी पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे हा प्रकार सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडला.
पाथरी पोलीस ठाण्यात पोलीस जमादार रफिक मुस्ताक अन्सारी हे गोपनीय शाखेत कार्यरत आहेत. आज सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास ते पाथरी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. यावेळी पोलीस निरीक्षक गणेश राहीरे यांच्यासोबत तिरंगा रॅली नियुक्ती संदर्भात चर्चा सुरू असताना वाद झाला.
यानंतर दुपारी 2.44 वाजेच्या सुमारास जमादार अन्सारी यांनी व्हाट्सअपवर, ''आज रोजी पोलीस निरीक्षक राहिरे साहेब यांनी अपमानित करून मला खूप वाईट वागणूक दिली आहे. मला खूप वाईट वाटले. आत्महत्या करावे या सारखे पाऊल उचलावे वाटते'', असे स्टेटस अपडेट केले. त्यानंतर ते पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. स्टेट्स अपडेटनंतर त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्ही मोबाईल बंद आढळून आले. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मानवत येथील पोलीस बंदोबस्त आवरला की पाथरी येथे बंदोबस्त ठेवायचा आहे. डायरीवर नोंद घ्या, असे सांगितले. यावर मला लेखी आदेश द्या असे जमादार म्हणू लागले. त्यांना आवश्यक तेवढेच काम सांगितले होते. मात्र त्यांना ते आवडले नाही, अशी माहिती या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक गणेश राहिरे यांनी दिली.