परभणी : उपोषण मागे घेण्यासाठी अपमानित केल्याने चक्कर येऊन पडलेल्या उपोषणकर्त्याला दवाखान्यात दाखल न करणाऱ्या संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उपोषणकर्त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
येथील बस स्थानकासमोरील सर्व्हे नंबर ४४५ मधील २० गुंठे गायरान जमिनीची मोजणी करावी, या मागणीसाठी लक्ष्मण पवार व जहीर अहमद यांनी १५ ऑगस्टपासून उपोषण सुरू केले. १६ ऑगस्ट रोजी तहसीलदारांनी म्हणणे ऐकून न घेता अपमानित केले. त्यामुळे जहीर अहमद यास कार्यालयातच चक्कर आली. मात्र, तहसीलदारांनी या उपोषणकर्त्याची साधी विचारपूस केली नाही, तसेच त्याला दवाखान्यातही दाखल केले नाही. आम्हीच ऑटोरिक्षा बोलावून जहीर अहमद यास दवाखान्यात दाखल केले. परभणी बस स्थानकासमोरील सर्व्हे नंबर ४४५ मधील २० गुंठे गायरान जमिनीची मोजणी करून सीमांकित करावी, अशी आमची मागणी आहे, परंतु हा प्रश्न सोडविता उपोषणकर्त्याला अपमानित केले. या प्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या तहसीलदारांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली, तसेच आमचे उपोषण सुरूच आहे. मागणी मान्य करेपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असे लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.