लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वसमत तालुक्यातील माटेगाव, परळी, ढवळगाव या नदीकाठच्या गावांमध्ये येऊन परभणीचेतहसीलदार विद्याचरण कडावकर हे लहान मुले, महिला व शेतकऱ्यांना मारहाण करीत असून, यामुळे वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार वसमतच्या तहसीलदार ज्योती पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका पत्रान्वये केली आहे़याबाबत दिलेल्या पत्रात वसमतच्या तहसीलदार ज्योती पवार यांनी म्हटले आहे की, १० जानेवारी रोजी परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी माटेगाव येथे लहान मुले, महिला, शेतकरी यांना मारहाण केली़ त्यामुळे या गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता़ त्यामुळे मी मंडळ अधिकारी, तलाठी व हट्टा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकांना या गावात पाठवून परिस्थिती आटोक्यात आणली़ त्याच दिवशी सुमारे ४०० ते ५०० लोकांचा जमाव गावात जमा होता़ या ग्रामस्थांची समजूत काढून परिस्थिती हाताळली़ १८ जानेवारी रोजी परळी येथे लहान मुले व शेतकºयांना मारहाण केली गेली़ त्यावेळीही ४०० ते ५०० लोकांना जमाव जमला होता़ तेथेही तलाठी व मंडळ अधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली़ परभणी तहसीलदार हे वारंवार वसमत तालुक्यातील नदीकाठच्या गावात येऊन नागरिकांना मारहाण करीत आहेत़ परभणी तालुक्याच्या कार्यक्षेत्राबाहेर जावून कडवकर हे विनाकारण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत असल्याने त्यांना समज द्यावी, अशी विनंती वसमतच्या तहसीलदार ज्योती पवार यांनी केली आहे़ १७ फेब्रवारी रोजी हे पत्र जिल्हाधिकाºयांना मिळाले.परभणीच्या हद्दीतील वाळू उपसा करीत असल्याने केली कारवाई- कडवकर४परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यांच्या सामाईक नदीतील परभणीच्या हद्दीतून अवैधरित्या वाळुचा उपसा वसमत तालुक्यातील व्यक्ती करीत असल्याची माहिती मिळाल्याने कारवाईसाठी पथकासह गेलो होतो़ आम्हाला पाहून सदरील व्यक्ती वाहनासह वसमतच्या हद्दीत निघून गेले़ त्यांचा पाठलाग केला़ त्यावेळी सदरील वाहन सोडून हे व्यक्ती पळून गेले़ हे वाहन ताब्यात घेवून तेथील वाळूसाठ्यांचे नोटकॅमद्वारे फोटो काढून परत येताना माटेगाव येथील महिला व ग्रामस्थांनी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला़ याबाबत हट्टा पोलिसांना आपण बोलावून घेतले तसेच वसमतच्या तहसीलदार ज्योती पवार यांना फोनवर कल्पना दिली़ परभणी तालुक्यातून वाळू उपसा करून वाळूमाफिया वसमतमध्ये पळून जात आहेत़ त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची पवार यांच्याकडे विनंती केली व परभणीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यासाठी वसमतच्या हद्दीत गेलो, याला चुकीचे कसे म्हणता येईल, असा सवाल तहसीलदार कडवकर यांनी केला़
परभणी तहसीलदारांचा वसमत हद्दीत हस्तक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:44 AM