परभणी : शहरातील एका कपड्याच्या दुकानातून तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या नावाचा वापर करून जिल्हाकचेरीत रमजान ईद निमित्ताने गोरगरिबांना जिल्हाधिकारी ड्रेस वाटप करणार आहेत आणि त्यासाठी आर्थिक मदत म्हणून पैशांचे वाटप करणे आहे, असे सांगून एका व्यापाऱ्यास दोन लाख १० हजारांना फसविण्यात आले होते. हा प्रकार २७ एप्रिलला घडला होता. यामध्ये शासकीय कार्यालयाच्या नावाने फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय आरोपीस परभणी पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, शहरात शगुन कलेक्शन या दुकानात आरोपी याने मी जिल्हाधिकारी यांचा पीए असल्याचे फिर्यादीस सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ईदनिमित्त गोरगरीबांना पैसे व कपड्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्याकरिता आपण दोन लाख दहा हजार रुपये नगदी व सॅम्पल कपडे घेऊन चला, आम्ही पैसे व कपड्यांचे बिल तुम्हाला देऊ, असे सांगून कार्यालयातून पैसे घेऊन पसार झाला. याबाबत नानलपेठ ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. सदरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पूंड हे करीत होते. गुन्हा शासकीय अधिकाऱ्यांच्या नावे सांगून घडल्याने यापूर्वी देखील सदर आरोपीने अशा प्रकारचे गुन्हे करून व्यापाऱ्यांची फसवणूक करीत असल्याने पोलीस अधीक्षक रागसुधा.आर. यांनी स्थानिक गुन्हा शाखा अधिकारी व तपासिक अंमलदार यांना आरोपी शोधण्याच्या सूचना दिल्या. त्यावरून पथकाने आरोपीचा शोध घेतला असता त्याचे नाव शेख बाबू उर्फ बाबू मिया शेख छोटू मिया (४०, रा.रशीद टेकडी, नई आबादी, भोकर) असे निष्पन्न झाले. या नावावरून आरोपीचा शोध घेताना माहिती मिळाली. ज्यात सदर आरोपी अशाच प्रकारच्या गुन्ह्यात बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत अटकेत असल्याचे समजले. त्यावरून मंगळवारी सदर आरोपी चिखली ठाणे येथून गुन्ह्याच्या तपासात परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यास न्यायालयात बुधवारी हजर केले असता न्यायालयाने आरोपीस शनिवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
संबंधितावर एकूण १६ गुन्हे नोंदसदर आरोपीने यापूर्वी अनेक ठिकाणी अशाच प्रकारे शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची नावे सांगून व्यापारी व प्रतिष्ठितांची फसवणूक करून पैशाची लुबाडणूक केली आहे. त्याच्याविरुद्ध नवा मोंढा, नानलपेठ, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, सोलापूर जिल्ह्यातील विजापूर नाका, यवतमाळ, जालना, हैदराबाद, सिकंदराबाद, पुणे, तेलंगणा राज्यात अशा विविध ठिकाणी एकूण १६ गुन्हे नोंद आहेत.
खात्री करूनच व्यवहार करावेतशासकीय कार्यालयाचे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव सांगून कोणी इसम काही व्यवहार करण्यासाठी आल्यास संबंधित नागरिक व व्यापाऱ्यांनी समक्ष कार्यालयात येऊन खात्री करूनच पुढील कायदेशीर मार्गाने व्यवहार करावेत. जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही.- रागसुधा.आर, पोलीस अधीक्षक.