५०१ नागरिकांचे अहवाल अनिर्णायक
परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या तपासण्या वाढविण्यात आल्या असताना अनिर्णायक अहवालांची संख्याही वाढली आहे. आतापर्यंत ८८ हजार ५९७ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५०१ नागरिकांचे अहवाल अनिर्णायक आहेत. १०५ नागरिकांचे अहवाल प्रयोगशाळेने नाकारले असून, दोघांचे अहवाल प्रलंबित ठेवले आहेत.
४७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये
परभणी : जिल्ह्यात सध्या ८६ रुग्ण कोरोनावर उपचार घेत असून, त्यापैकी ४७ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार केले जात आहेत. आरोग्य विभागाने ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने होम आयसोलेशन रुग्णांची संख्या वाढली आहे. येथील आयटीआय हॉस्पिटलमध्ये २१, सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात २, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात १, पूर्णा ग्रामीण रुग्णालयात ३ रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये १२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्याचा पारा १३ अंशावर
परभणी : जिल्ह्यात मागील आठवड्यात तापमानात वाढ झाली आहे. सोमवारी किमान तापमान १३.२ अंश नोंद झाले आहे. किमान आणि कमाल या दोन्ही तापमानांमध्ये वाढ होत असल्याने वातावरणातून थंडी गायब झाली आहे.
डांबरीकरण केलेला रस्ता फोडला
परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानाच्या पाठीमागील बाजूने नवा मोंढा पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काही दिवसांपूर्वीच डांबरीकरण केले होते. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय दूर झाली. मात्र दोन दिवसांपूर्वी मनपा प्रशासनाने जलवाहिनी टाकण्यासाठी नवीन रस्त्यावर खोदकाम केले आहे. मोठा खड्डा तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या संपूर्ण रस्त्याच्या बाजूनेही जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे डांबरीकरण केलेला रस्ता पुन्हा उखडला आहे.
क्रिकेट पीच बनविण्याचे काम ठप्प
परभणी : येथील जिल्हा स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी टर्फ विकेट पीच बनविण्याचे काम क्रीडा विभागाने हाती घेतले आहे. चार महिन्यांपासून हे काम करण्यासाठी मैदानावर मधोमध मोठा खड्डा तयार करण्यात आला आहे. सद्यस्थितीला हे काम ठप्प आहे. काही दिवसांपूर्वी क्रीडा विभागाच्या विरोधात ओरड झाल्यानंतर केवळ काळी माती आणून काम पुन्हा सुरू केल्याचा दिखावा करण्यात आला.