देशातील रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी रस्ते अपघाताचा अचूक डाटा संकलित करून आयआयटी मद्रासद्वारे या डाटाचे विश्लेषण करण्यात येते. यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने मोबाइल आणि वेब ॲप्लिकेशन विकसित केले आहे. रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची नोंद करणे, या अपघाताची माहिती संकलित करून त्या माहितीच्या आधारे अपघात कसे कमी करता येतील, याची चिकित्सा करण्यात येणार आहे. या अंतर्गत पोलीस विभागाकडून दररोज होणाऱ्या अपघातांच्या नोंदी मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे अपलोड केल्या जात आहेत. या कामी पोलीस विभागातील अधिकारी कोटकर, मोरे, पटवे, परिवहन विभागातील जयेश देवरे, अभिजित तरकसे, प्रवीण पाटील, अभिजित वाघमारे यांचे सहकार्य लाभत आहे. ३९३ अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण हा प्रकल्प परभणी जिल्ह्यात सुरू करण्यासाठी पोलीस विभागातील ३८० आणि परिवहन विभागातील १३ अशा ३९३ अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. एनआयसीचे आयआरएडी रोल आउट मॅनेजर सावनकुमार कुपटेकर यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. विशेष म्हणजे या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली असून, जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ५० अपघातांची नोंदही करण्यात आली आहे. आयआरएडी ॲप्लिकेशनच्या मदतीने देशाच्या प्रत्येक भागातून अपघात डेटा एकत्र करणे आणि देशभरातील जमा केलेल्या रस्ते अपघातांच्या आकडेवारीचे विश्लेषण करून, त्यानुसार भारतातील रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आणि रस्ते सुरक्षा वाढविण्यासाठी उपाययोजना करणे, हा प्रकल्पाचा उद्देश आहे.
सुनील पोटेकर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी