लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्वच्छता अभियानांतर्गत खाजगी एजन्सीला २३ लाख ९५ हजार रुपयांचा निधी वितरित करताना अनियमितता केल्या प्रकरणी मानवत पंचायत समितीच्या ३ अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबित केले आहे.जिल्हा परिषदेच्या स्वच्छता अभियानांतर्गत होणाऱ्या कामांमध्ये अनियमितता झाल्याचा प्रकार तत्कालीन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता. हे प्रकरण राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातही उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर खोडवेकर यांची पुणे येथे बदली झाली होती. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा स्वच्छता अभियानांतर्गत करण्यात येणाºया कामातील निधी वितरणात अनियमितता झाल्याचा प्रकार घडला आहे. मानवत पंचायत समितीतील विस्तार अधिकारी पानपाटील, सहाय्यक लेखाधिकारी पोदार व लिपिक संदीप गाडे यांनी नियमबाह्यरीत्या एका पुरवठादार खाजगी एजन्सीला २३ लाख ९५ हजार रुपयांचा निधी वितरित केला होता. याप्रकरणाची उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली. त्यामध्ये हे तीन अधिकारी दोषी आढळून आले. त्यानुसार त्यांना प्रशासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन कालावधीत त्यांना परभणी पंचायत समिती मुख्यालय देण्यात आले आहे.माहिती देण्यास अधिकाºयांचा नकारजिल्हा परिषेदच्या स्वच्छता अभियानांतर्गत अनियमितता केल्या प्रकरणी निलंबित केलेल्या ३ कर्मचाºयासंदर्भात माहिती देण्यास या विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.व्ही.करडखेलकर यांनी नकार दिला. सामान्य प्रशासन विभागाकडे याची फाईल आहे. तुम्ही त्यांच्याकडून माहिती घ्या, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दवाखान्यात असल्याने सध्या आपल्याकडे माहिती नाही. करडखेडकर यांच्याकडून माहिती घ्या, असे सांगितले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांशी बोलून त्यांकडून माहिती घेण्यास सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी माहिती देत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पृथ्वीराज यांनी कार्यालयीन चौकशी सुरु असल्याने सविस्तर माहिती देऊ शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे या संदर्भातील माहिती देण्यास अधिकाºयांकडून का टाळाटाळ केली जात आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
परभणीत निधी वितरणात अनियमितता: मानवतचे ३ अधिकारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:54 AM