लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीं संदर्भातील दाखल प्रस्तावांमध्ये त्रुटी नसतानाही या संदर्भातील फाईल्स कर्मचाऱ्यांकडून अडवल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे १७ मार्च रोजी काही पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीतील नरेगा कक्षाला कुलूप ठोकण्याचा प्रयत्न केला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिंचन विहिरींसाठी कुशल आणि अकुशल स्वरुपात ३ लाख रुपयांपर्यंत अनुदान शासनाच्यावतीने देण्यात येते. या संदर्भातील पात्र लाभार्थ्यांची ग्रामसभेत निवड केल्यानंतर त्यांचे प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीकडे पाठविण्यात येतात. पाथरी पंचायत समितीमध्ये ‘नरेगा’च्या कामासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षांतर्गत आलेल्या प्रस्तवांची छाननी करुन ऑनलाईन सेक्युअर सॉफ्ट प्रणालीत पुढील तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया केली जाते. पाथरी पंचायत समितीत गेल्या दीड वर्षांपासून आलेल्या प्रस्तावांपैकी १२४ नवीन सिंचन विहिरींच्या कामांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. मात्र, दाखल प्रस्तावांपैकी अनेक प्रस्तावांमध्ये त्रुटी नसतानाही प्रशासकीय मान्यतेसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात आले नाहीत. काही प्रस्ताव दिरंगाईने मान्यतेसाठी पाठविण्यात आले. ही बाब उघडकीस आल्यानंतर १७ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ग्रामीण भागातील काही पदाधिकारी पंचायत समितीमध्ये आले. यावेळी त्यांनी प्रस्तावाच्या दिरंगाईबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारला. कर्मचारी समाधानकारक उत्तर देत नसल्याने या कक्षाला कुलूप ठोकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यावेळी गटविकास अधिकारी राहुल कोरेगावे यांनी या पदाधिकाऱ्यांची समजूत काढून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पदाधिकारी शांत झाले.
बीडीओंच्या परस्पर सीईओंकडे फाईल
पाथरी पंचायत समितीतील नरेगा विभागातील सावळा गोंधळ यानिमित्ताने समोर आला. जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती मीरा टेंगसे यांच्या रेणापूर ग्रामपंचायतीने ११ लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले होते. हे प्रस्ताव ऑनलाईन न करता, ते तसेच प्रलंबित ठेवण्यात आले. १२ व्या नंबरचा प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. ही बाब लक्षात आल्यानंतर सभापती टेंगसे यांनी ‘नरेगा’चे तांत्रिक अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्याकडे केली. यावेळी त्यांनी तांत्रिक अधिकाऱ्यांच्या अनियमिततेचा पाढा वाचला. त्यानंतर त्यांच्या बदलीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असल्याचे गटविकास अधिकारी काेरेगावे यांनी सांगितले.
मनरेगा विभागातील काही कर्मचारी चुका करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. संबंधितांना सुधारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ज्या कर्मचाऱ्यांविषयी तक्रार आहे, त्या कर्मचाऱ्यांच्या बदलीचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे.
- सुहास कोरेगावे, गटविकास अधिकारी, पाथरी