परभणी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने कोणतीही तडजोड न करता स्वबळावर निवडणुका लढण्याच्या दृष्टीकोनातून स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन अहवाल सादर करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या सर्व जिल्हाध्यक्षांना दिले आहेत. परभणी जिल्ह्यात या दृष्टीकोनातून पक्षाची वाट कठीणच आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत पालम नगर पंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच डिसेंबरमध्ये गंगाखेड, सेलू, जिंतूर, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या नगरपालिकांच्या तर मार्चमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. तसेच एप्रिलमध्ये परभणी महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या सर्व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी पक्षाच्या सर्व जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्षांना २४ नोव्हेंबर रोजी पत्र पाठवले आहे. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुका काँग्रेस पक्षाने कोणतीही तडजोड न करता स्वबळावर लढविण्याच्या दृष्टीने आपल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन आढावा घ्यावा. तसेच या संदर्भात नियोजन करुन आपला अहवाल प्रदेशाध्यक्षांना सादर करावा. जिल्ह्यातील गठित केलेल्या बुथ कमिट्यांची तपशीलवार माहिती सादर करावी, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या दृष्टीकोनातून जिल्ह्यात पक्ष पदाधिकाऱ्यांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. प्रत्यक्षात काँग्रेस पक्षाची जिल्ह्यातील स्थिती पाहिली असता, काही तालुक्यांमध्ये पक्षाची स्थिती समाधानकारक नाही. परभणी महानगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात असून, शहरात पक्षाची चांगली ताकद आहे; परंतु, ग्रामीण भागात पक्षाची दयनीय अवस्था आहे. जिंतूर तालुक्यातही पक्षाची स्थिती समाधानकारक नाही. पक्षाचे प्रदेश सचिव सुरेश नागरे यांच्यामुळे या तालुक्यात पक्ष काही प्रमाणात जिवंत झाला आहे; परंतु, एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पक्षाचे प्रतिनिधीत्व नाही. सेलू शहरात काहीअंशी पक्षाची ताकद आहे; परंतु, ग्रामीण भागात पक्षाला वाली नाही. पाथरी शहर व तालुक्यात पक्षाची अत्यंत दयनीय स्थिती आहे. या तालुक्यात पक्ष संघटनच निष्क्रीय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा येथे पूर्णपणे दबदबा आहे. काँग्रेस पक्षाने संघटन वाढविण्यासाठी या तालुक्यात लक्ष दिलेले नाही. सोनपेठमध्येही पक्षाची समाधानकारक स्थिती नाही. काँग्रेसकडून निवडून आलेले चंद्रकांत राठोड, नगराध्यक्ष जिजाबाई राठोड यांच्यासह ११ सदस्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मानवत शहरात काँग्रेसची काही प्रमाणात ताकद आहे. ग्रामीण भागात मात्र फक्त एक जिल्हा परिषद सदस्य व एक पंचायत समिती सदस्य पक्षाकडे आहे.
गंगाखेड मतदारसंघात दयनीय स्थिती
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात पक्षाची दयनीय स्थिती आहे. काँग्रेसकडून निवडून आलेले गंगाखेडचे नगराध्यक्ष विजय तापडिया काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत गेले. शहरात पक्षाचे काही नगरसेवक निवडून आले आहेत. परंतु, पक्ष संघटनेचे कार्य फारसे परिणामकारक नाही. ग्रामीण भागात तर यापेक्षा अधिक वाईट स्थिती आहे. पालम, पूर्णा शहर व ग्रामीण भागातही पक्ष संघटन मजबूत नाही. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचा स्वबळाचा नारा फारसा प्रभावी ठरेल, असे दिसत नाही.