परभणी स्थानकावरून दररोज २२ ते २४ विशेष रेल्वे ये-जा करतात. या ठिकाणी कोरोनामुळे मागील वर्षभरापासून प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर ३० रुपये प्रतिव्यक्ती करण्यात आले आहेत. यामुळे काही वेळासाठी घरातील सदस्यांना किंवा मित्र, नातेवाईक यांना स्थानकावर सोडायला जाणे परवडणारे राहिले नाही. एरव्ही १० रुपयाचे प्लॅटफॉर्म तिकीट अनेक जण काढत असत, मात्र आता दर वाढल्याने प्लॅटफॉर्म तिकीट काढण्यास अनेक जण टाळाटाळ करत आहेत. दक्षिण मध्य रेल्वे विभागाने सिकंदराबाद, हैदराबादप्रमाणे छोट्या स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर कमी करावेत, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
वर्षभरापासून ३० रुपयांचा भुर्दंड
मागील वर्षी एप्रिलपासून रेल्वे सेवा कोरोनामुळे बंद झाली. यानंतर जुलैपासून काही रेल्वे सुरू झाल्या. जुलै ते मार्च २०२१ पर्यंत जवळपास ९ महिने ५० रुपये प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर होते. यानंतर हे दर मार्चपासून आतापर्यंत ३० रुपये झाले आहेत. अद्याप १० रुपये दर दक्षिण मध्य रेल्वे विभागात परभणी व अन्य महत्त्वाच्या स्थानकांवर झालेले नाहीत.
रोज सरासरी ५० प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री
कोरोनापूर्वी दररोज प्लॅटफॉर्म तिकीट सरासरी ५०० ते ६०० विक्री होत होते. आता प्लॅटफॉर्मचे दर तिप्पट झाल्याने त्याच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. सध्या सरासरी रोज केवळ ५० ते ६० प्लॅटफॉर्म तिकिटाची विक्री होत आहे. यामुळे रेल्वेस्थानकात कोणीही ये-जा करीत आहे. तसेच महसुलावर परिणाम झाला आहे.
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
नांदेड-पुणे साप्ताहिक
सिकंदराबाद- मुंबई देवगिरी
नांदेड- मुंबई तपोवन
नांदेड- पनवेल
नांदेड-मुंबई राज्यराणी
आदिलाबाद-मुंबई नंदिग्राम
धर्माबाद-मनमाड मराठवाडा
नांदेड- अमृतसर सचखंड