परभणी : शेती आणि शेतकरी हित शिवरायांना सर्वोच्च होते. कित्येक वेळा अत्यंत कठीण परिस्थिती उद्भवली; मात्र अशा परिस्थितीतही शिवरायांनी शेतकरी हित जपले. त्यांचे शेती धोरण आजही जपणे गरजेचे आहे, असे मत मंचक दुधाटे यांनी व्यक्त केले.
येथील पाणी, वीज बचत गटाच्यावतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात दुधाटे बोलत होते. यावेळी रणजित कारेगावकर, प्रा.डॉ.जयंत बोबडे, पत्रकार पंकज क्षीरसागर, बंडू मगर, शेख सलाम, प्रसाद ठाकूर आदींची प्रमुख उपस्थिती होती. दुधाटे म्हणाले की, स्वराज्य हे आपले आहे आणि ते स्वतंत्रही आहे, ही जाणीव करून देत त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आठरा पगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. स्थानिक भूमिपुत्रांना सैनिक म्हणून सामावून घेतले. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून लढण्याची स्फूर्ती दिली. शेतीला व शेतकऱ्यांना राजांनी विशेष संरक्षण दिले, असे त्यांनी सांगितले. रणजित कारेगावकर यांनी सूत्रसंचालन केेले. विष्णू मेहेत्रे यांनी प्रास्ताविक केेले. रघुनाथ शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक चांदणे, बाळासाहेब सिनगारे, संजय देसाई, संदीप खरडे, भीमा मोरे, दीपक फाटे, शेख मोहसीन, नितीन जवंजाळ, शेख रिहान, राजेश महामुने, दीपक घाटुळ, शेख अब्दुल, विशाल शिंदे, रोहीत पाटील, शेख खदीर, संजय अग्रवाल आदींनी प्रयत्न केले.