बोरी : एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतात कीटकनाशकांवर होणारा खर्च कमी करणे शक्य आहे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी एस. पी. काळे यांनी केले.
जिंतूर तालुक्यातील नागठाणा येथे ७ जानेवारी रोजी ‘एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे महत्त्व’ या विषयावर शेतीशाळा घेण्यात आली. शरद ठमके यांच्या शेतात पार पडलेल्या कार्यक्रमात काळे बोलत होते. ते म्हणाले, कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क या नैसर्गिक कीडनाशकांचा वापर करावा. पक्षिथांबे लावणे, कामगंध सापळ्यांचा वापर करणे, पिकांची फेरपालट करणे तसेच पिकांवरील किडींचे वेळोवेळी निरीक्षण करूनच आवश्यकता वाटल्यास रासायनिक कीडनाशकांचा वापर करणे आवश्यक आहे. यातून कीडनाशकांवरील होणारा खर्च टाळता येणार आहे. याप्रसंगी प्रगतिशील शेतकरी संतोष ठमके, मधुकरराव ठमके, मुंजाभाऊ ठमके, भगवान ठमके, महादेव ठमके, विजय ठमके आदींची उपस्थिती होती. कृषी सहाय्यक लोंढे, घनसावंत व शरद ठमके यांनी या शेतीशाळेचे आयोजन केले होते.