परभणी : मागील काळात मतांचे विभाजन होऊन जातीयवादी शक्ती बळकट झाली व संविधान संपविण्याचे षडयंत्र सुरू झाले. मात्र, आगामी काळात जातीय शक्तींना मदत करणाऱ्यांना त्यांची जागा समाजाने दाखवून दिली पाहिजे. त्यासाठी समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले.
येथील माहेर मंगल कार्यालयात भीमशक्तीच्या वतीने आयोजित आदर्श मातांच्या गुणगौरव सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी हंडोरे बोलत होते. त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पू.भदंत मुदितानं, आ.सुरेश वरपूडकर, सुरेश नागरे, रवि सोनकांबळे, कडूबाई खरात आदींची प्रमुख उपस्थिती होती. ज्या माउलींनी मजुरी करून आपल्या पाल्यांना आदर्श नागरिक बनविले, अशा १०० आदर्श मातांचा यावेळी साडी चोळी व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला, तसेच विविध क्षेत्रांतून चळवळीला गती देणाऱ्या २० मान्यवरांचा मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. युवा जिल्हाध्यक्ष सतीश भिसे यांनी प्रास्ताविक केेले. प्रा.अतुल वैराट यांनी सूत्रसंचालन केले. पुष्पा उबाळे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी बाबुराव केळकर, प्रदीप एंगडे, राहुल डुमणे, बबन वाव्हळे, तातेराव वाकळे, नदीम खान, मन्सुर पटेल, नितीन डुमणे, दीपक सावंत, अंकुश वानखेडे, राजू खरात, राहुल कनकुटे, प्रमोद कुलदीपके, चंदन मस्के, संजय साबळे, शैलेश वडमारे, सुरेश प्रधान, सिद्धार्थ भारशंकर, सागर दीपके, रोहण डुमणे आदींनी प्रयत्न केले.