शहरासह जिल्ह्यात एकूण २५ राष्ट्रीयीकृत बँक तसेच ५ ते ७ खासगी बँका यासह अनेक पतसंस्था उपलब्ध आहेत. या सर्व बँकांच्या माध्यमातून विविध कर्जांचे वाटप केले जाते. ज्यामध्ये गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, सोनेतारण कर्ज व व्यावसायिकांसाठी कर्ज दिले जाते. कोरोनापूर्वी अनेकांनी कर्ज घेतले. मात्र, कोरोना कालावधीत लॉकडाऊन लागल्याने अनेकांचे व्यवसाय ठप्प पडले, तर काहींच्या नोकर्या गेल्या व काही जणांचे पगार कमी झाले. या सर्वांचा परिणाम घरखर्चासह कर्जाचे हप्ते फेडण्यावर झाला. यातून काहीजणांचे थकीत कर्ज वाढले. यामुळे बँकेकडून सवलत देऊनही कर्ज न फेडणाऱ्या कर्जदारांवर कारवाई करण्यासाठी नोटीस पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सारीच कर्जे थकली, गृहकर्जाचे प्रमाण जास्त
परभणी शहरात २० ते २५ राष्ट्रीयीकृत बँका आहेत. यामध्ये एसबीआय बँकेच्या ५ ते ६ शाखा आहेत. या व्यतिरिक्त अन्य बँकांच्या एक किंवा दोन शाखा उपलब्ध आहेत. प्रत्येक बँकेतून वेगवेगळ्या प्रकारची कर्ज प्रकरणे मंजूर केली जातात. यानुसार कर्जदाराला प्रती महिना हप्ता लावून देण्यात येतो. मात्र, कोरोनामुळे अनेकांनी कर्ज भरण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या कर्जदारांना नोटीस पाठविली जात आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण गृहकर्जाचे असल्याचे बँकेच्या अधिकार्यांकडून समजते.
माॅरिटोरियमचा घेतला अनेकांनी लाभ
कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर देशभरात बँकेच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तीन महिन्यांची सूट मागील वर्षी एप्रिल ते जून या कालवधीसाठी देण्यात आली होती. या माॅरिटोरियम अंतर्गत बँकेमध्ये कर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर तीन महिने कर्जाचे हप्ते न भरता त्याचे एकरकमी व्याज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या योजनेचा अनेक कर्जदारांनी लाभ घेतला होता. मात्र, केंद्र शासनाने माॅरिटोरियम केवळ तीन महिने लागू केले. परंतु, एक वर्ष झाले कोरोना सुरूच असल्याने अनेकांच्या कर्जाचे हप्ते अजूनही थकीत आहेत.
नोटीसचे प्रमाण वेगवेगळे
प्रत्येक बँकेच्या वतीने कर्ज देताना व कर्जाची परतफेड करताना आपल्या स्तरावर वेगवेगळी प्रक्रिया राबविली जाते. यामध्ये काही बँकांकडून सलग तीन ते सहा महिन्यांनंतर रक्कम भरण्यास टाळाटाळ केली जात असेल तर केवळ नोटीस पाठवली जाते. यानंतरही वाट पाहून पैसे भरले जात नसतील तर कायदेशीर कारवाई केली जात आहे.
नोकरी गेली, गृहकर्ज थकले
कोरोनापूर्वी असलेला पगार काही खासगी कंपन्यांनी कोरोना काळात ५० टक्के केला. यामुळे घरखर्च कसा करावा व कर्ज कसे फेडावे या विवंचनेत अनेक जण सापडले आहेत. याचा फटका बसल्याने गृहकर्ज थकले आहे.
- विलास ठेंग
बँकेकडून गृहकर्ज घेतले होते. त्याचे सध्या सहा महिन्यांत काही हप्ते बाकी आहेत. यामुळे बँकेकडून केवळ फोनवर कर्जाचे हप्ते भरण्यासाठी विनंती करण्यात आली. नोकरी गेल्याने कर्ज फेडण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- राहुल मिसाळ.
दुकान बंद पडले, कर्ज कसे फेडणार ?
शहरात जवळपास १५ ते २० हजार दुकाने आहेत. यातील औषधी दुकान वगळता अन्य सर्व व्यवसाय कोरोना काळात जवळपास ठप्पच होते. एक वर्षानंतर काही दुकाने सुरू झाली आहेत. मात्र, व्यवसाय वाढीसाठी घेतलेले कर्ज थकल्याने व्यापारी अडचणीत सापडले आहेत. यामुळे अनेकांसमोर कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न पडला आहे.