राज्य शासनाने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यभर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल व्यापारी, लघुव्यावसायिक नाराज आहेत. या अनुषंगाने किरकोळ व्यापारी व लघुव्यावसायिकांच्या पत्नींच्या प्रतिक्रिया घेतल्या असता त्यांनी शासन निर्णयाबाबत संताप व्यक्त केला. सारखी दुकाने बंद असल्याने इथं गळ्यातली चेन विकण्याची वेळ आली, कसलं ब्रेक द चेन. व्यवसाय बंद असल्याने घरखर्च भागवताना नाकीनव येत आहेत. पैशांची चणचण असल्याने घरात किरकोळ वादाचे प्रसंग घडत असल्याच्या प्रतिक्रिया या गृहिणींनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
दोन महिनेच सुरू राहिला व्यवसाय, कर्ज कसे फेडायचे?
गेल्यावर्षी मार्चपासून जुलैपर्यंत अनेक निर्बंध होते. त्यामुळे व्यवसाय चक्क बंद होता. त्यामुळे इतरांकडून हातउसणे घेऊन घरखर्च करावा लागला. त्यांची देणी देणे आणखी बाकी आहे. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात पूर्ण क्षमतेने बऱ्यापैकी व्यवसाय झाला. त्यामुळे लोकांची देणी, घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडायचे नियोजन केले होते; मात्र ते फोल ठरल्याचे या गृहिणी म्हणाल्या.
कोरोनामुळे प्रशासन सतत नवीन नियम लावत आहे. त्याचा आमच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहकही फारसे येण्यास तयार नाहीत. त्यामुळे भागवायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. नेहमी लॉकडाऊन हा पर्याय कसा काय असू शकतो. शासनाने निर्णय घेतना जरा लघुव्यावसायिकांचाही विचार केला पाहिजे.
-निर्मला चव्हाण, गृहिणी
हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता ३० एप्रिलपर्यंत आम्ही काय खायचं. हॉटेलचं भाडे, लाईट बिल यासाठी पैसे कोठून आणायचे, शिवाय नातेवाइकांकडून उधार पैसे घेतले आहेत. ते आज ना उद्या द्यावे लगणार आहेत. ते कसे द्यायचे, असा प्रश्न पडला आहे.
-आशाताई मस्के, गृहिणी
गेल्यावर्षी व्यवसाय बंद असल्याने घरात ठेवलेले पैसे घरखर्चासाठी वापरले. आता तेही नाहीत. आता पोटाला चिमटा देऊन केलेले दागिने विकण्याची वेळ या नेहमीच्या बंदमुळे आली आहे.
-गयाबाई शळके, गृहिणी