परभणी : राज्य शासनाच्या जीवन अमृत योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असून या योजनेतून १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या १० महिन्यात ९९३ रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे ‘ब्लड ऑन कॉल’ या सेवेने जिल्ह्यातील ९९३ रुग्णांचे १० महिन्यात प्राण वाचविले आहेत.
एखाद्या घटनेतील रुग्णाला तात्काळ रक्त मिळावे, रक्तावाचून रुग्णाचा मृत्यू होऊ नये, या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील ४० कि.मी. अंतरापर्यंत काही वेळातच रक्ताची पिशवी उपलब्ध व्हावी, यासाठी जानेवारी २०१४ पासून राज्य शासनाने ‘ब्लड ऑन कॉल’ योजनेची अंमलबजावणी सुरु केली. या योजनेंतर्गत रुग्णांना रक्तपिशवीची आवश्यकता असल्यास त्या रुग्णाने किंवा नातेवाईकाने १०४ या टोल फ्री क्रमांकावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
नोंदणी केल्यानंतर संबंधित रुग्णाला अर्ध्यातासात रक्ताचा पुरवठा केला जातो. २०१४ पासून सुरु केलेल्या या योजनेला दरवर्षी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०१४ या आर्थिक वर्षात ७४६ रुग्णांना ‘ब्लड ऑन कॉल’ या योजनेतून रक्त पुरवठा करण्यात आला आहे. त्याच बरोबर २०१५ या आर्थिक वर्षात ७२३ रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात आला. तसेच २०१६ मध्ये १ हजार २० रुप्णांनी १०४ या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन रक्त पिशवी मिळविली आहे. २०१७ मध्ये ७३२ तर २०१८ मध्ये ७१९, २०१९ या आर्थिक वर्षात सर्वाधिक १ हजार २५८ तर जानेवारी ते ऑक्टोबर २०२० या १० महिन्यात ९९३ रुग्णांना जीवन अमृत योजनेंतर्गत रक्त पुरवठा करण्यात आला. त्यामुळे रुग्णांचे जीव वाचविण्यास एक प्रकारची मदत झाली आहे.
असा झाला रक्तपुरवठापरभणी जिल्ह्यामध्ये अरुणोदय बहुउद्देशीय सेवा संस्था चाटोरी मार्फत जीवन अमृत सेवा म्हणजेच ब्लड ऑन कॉलचे काम पाहिले जाते. या संस्थेने १ जानेवारी ते ऑक्टोबर २०२० या १० महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील ९९३ रुग्णांना ४० कि.मी. अंतरापर्यंत रक्त पिशव्या पोहचविल्या आहेत. यामध्ये जानेवारीत ११६, फेब्रुवारी ११८, मार्च १२८, एप्रिल ९२. मे ९८, जून ९५, जुलै ९७, ऑगस्ट ८१, सप्टेंबर ८५ तर ऑक्टोबर महिन्यात ८३ रुग्णांना रक्त पुरवठा करुन त्याचे प्राण वाचविण्यास मदत केली आहे.