जिल्हा नियोजन समितीची शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री नवाब मलिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार बाबाजाणी दुर्राणी, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलीस अधीक्षक जयंत मीना, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, मनपा आयुक्त देविदास पवार, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, आदींची उपस्थिती होती. नियोजन समितीच्या बैठकीच्या समारोपात बोलताना पालकमंत्री नवाब मलिक यांनी पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या कामाचे कौतुक केले. शिवाय गंगाखेड येथील पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांचेही चांगले काम सुरू असल्याचे म्हटले. या क्षणी गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे हे खुर्चीवरून उठले व त्यांनी पोलीस अधीक्षक मीना व बोरगावकर यांच्या कौतुकास आक्षेप घेतला. मीना यांच्या कक्षात गेल्यानंतर त्यांनी आपणास कक्षातून बाहेर काढले. तसेच अपमानास्पद वागणूक दिली, असा आरोप केला. त्यावर पालकमंत्री मलिक यांनी तक्रार करण्याचे हे व्यासपीठ नाही. तुमची रीतसर तक्रार त्यांच्या वरिष्ठांकडे करा, सभागृहात करा, असे सांगितले. त्यावरून गुट्टे संतापले. त्यानंतर गुट्टे व पालकमंत्री यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी गुट्टे म्हणाले की, मी विरोधी पक्षातील आमदार असल्याने अशी वागणूक दिली जात आहे का? आज ही वेळ माझ्यावर आहे, उद्या तुमच्यावर येऊ शकते, असे ते म्हणाले. त्यावर पालकमंत्र्यांनी वेळ येऊ द्या, असे सांगितले. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील यांनीही गुट्टे यांना तुमची रीतसर तक्रार त्यांच्या वरिष्ठांकडे किंवा सभागृहात करा. ही तक्रार करण्याची जागा नाही. शांत रहा, असे सांगितले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी पुन्हा मध्यस्थी करत गुट्टे यांना शांत राहण्यास सांगितले. तसेच अधिकाऱ्यांनी आमदारांना कशा पद्धतीने वागणूक दिली पाहिजे, याबाबत शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. त्याचे पालन करावे, असे सांगितले.
हे तक्रारीचे व्यासपीठ नाही असे म्हणालो - मलिक
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री व आमदार गु्ट्टे यांच्यातील खडाजंगीचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर पालकमंत्री मलिक म्हणाले की, आमदार गुट्टे यांना जिल्हा नियोजन समितीची बैठक हे पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी करण्याचे किंवा त्यांची तक्रार करण्याचे व्यासपीठ नाही, तुम्हाला विधानसभा आहे, तिथे तुम्ही रीतसर तक्रार करा, असे सांगितल्याचे मलिक म्हणाले.