येलदरी वसाहत ( परभणी) : अर्ध्या मराठवाड्याची तहान भागवणारे येलदरी धरण अखेर १०० टक्के भरले आहे. यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र, धरणात खडकपूर्णा धरणातून मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने पूर नियंत्रणासाठी धरणाचे दोन वक्र दरवाजे उघडून आणि वीज निर्मिती केंद्राच्या तीन दरवाज्यातून पूर्णा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे पूर्णा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
येलदरी धरणात सध्या १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तसेच साडेबावीस मेगावॅट एवढी वीज निर्मिती देखील सुरू झाली आहे. यावर्षी येलदरी धरण भरेल की नाही, अशी शंका वाटत असतानाच संपूर्ण पावसाळ्या अखेर थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे येलदरी धरणात हळूहळू पाणी साठण्यास सुरुवात झाली. जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये धरणात २७ ते ३० टक्के एवढाच पाणीसाठा उपलब्ध झाला होता. मात्र, सप्टेंबर महिन्यानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे येलदरी धरणात देखील मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागले. त्यानंतरही पावसाचा जोर मंदावल्यामुळे धरण १०० टक्के भरेल की नाही असे वाटत असतानाच पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आवक वाढली.
बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाच्या दरवाजामधून शनिवारी ( दि. १२ ) सकाळी ४४ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आल्यामुळे येलदरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे पूर नियंत्रणासाठी येलदरी धरणाच्या जलविद्युत केंद्रातील तीन संचांमधून वीज निर्मितीद्वारे पूर्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. तसेच आवक वाढत असल्याने येलदरी धरणाचे देखील दोन दरवाजे उघडून विसर्ग वाढविण्यात आला आहे.
येलदरी धरण आज ३० पावसाळ्याअखेर शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे अर्ध्या मराठवाड्यातील म्हणजेच परभणी, हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. जवळपास ६० हजार हेक्टर एवढ्या जमिनीतील सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. तसेच औद्योगीकरणासह तीन जिल्हे, तालुके, २३५ हून अधिक खेडेवाड्यातांडे आदींचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील मिटला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.