परभणी : अपहृत मुलास नानलपेठसह सायबर पोलिसांनी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने अवघ्या सात तासांच्या आत पुण्यातून ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, या तपासासाठी परभणीच्या पोलिस अधीक्षकांनी थेट पुणे रेल्वेच्या एसपींना संपर्क केल्याने त्वरित हालचाल झाली.
परभणीतील फिर्यादींचा अल्पवयीन मुलगा मंगळवारी दुपारी साडेचार वाजता शिकवणीसाठी गेला; परंतु तो रात्रीपर्यंत घरी आला नाही. शोध घेऊन तो न मिळाल्याने अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्यास फूस लावून पळवून नेल्याची तक्रार बुधवारी दुपारी १२.१५ वाजता नानलपेठ ठाण्यात देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी प्रभारी अधिकारी सुशांत किणगे, पोलिस निरीक्षक शरद मरे, साईप्रसाद चन्ना यांना मुलाचा तत्काळ शोध घेण्याच्या सूचना दिल्या. यात पथकांची नेमणूक करून रवाना करण्यात आलेे. नानलपेठच्या अधिकाऱ्यांनी गोपनीय चौकशीद्वारे माहिती हस्तगत केली. सायबरच्या पथकाने तांत्रिक तपास केला.
मिळालेल्या माहितीतून अपहृत हा पुणे येथे असल्याचे समजले. यावर पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी पुणे रेल्वे विभागाचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार यांच्याशी संपर्क साधून पोलिस निरीक्षकांच्या पथकाद्वारे अपहृत मुलाचा शोध घेण्यास मदत मिळवून दिली. अपहृत मुलाच्या नातेवाइकांचीदेखील मुलाचा शोध घेण्यास मदत घेतली. त्यावरून या मुलास बुधवारी रात्री सात वाजता पुणे रेल्वे पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. मुलगा भेटल्याने त्याचे वडील व नातेवाइकांनी पोलिसांच्या कारवाईबद्दल अधिकारी, अंमलदार यांचा सन्मान केला. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात सपोनि. सुशांत किनगे, उपनिरीक्षक अशोक जटाळ, अंमलदार सुमेध पुंडगे, उमाकांत सुसे, गणेश कौटकर, स्वप्निल पोतदार यांनी केली.