मानवत : केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी विधेयकाच्या विरोधात किसान सभेच्या वतीने दि. २५ सप्टेंबर रोजी निदर्शने करण्यात आली आणि हे विधेयक मागे घ्यावे, या मागणीचे निवेदन तहसीलदार डी. डी. फुफाटे यांना देण्यात आले.
दु. १२: ३० वा. किसान सभेच्या कार्यालयापासून संत सावता माळी चौकापर्यंत पायी फेरी काढण्यात आली. संत सावतामाळी चौकात आल्यानंतर कृषी विधेयक मागे घ्यावे, अशा घोषणा देऊन विधेयकाच्या प्रती जाळण्यात आल्या. या आंदोलनात लिंबाजी कचरे पाटील, गजानन मसलकार, अशोक बुरखुंडे, अशोक बारहाते, गोविंद आमटे, आनंद भक्ते, संजय देशमुख, राणूबा कांबळे, प्रकाश पेडगावकर आदी सहभागी झाले होते.