ताडबोरगाव परिसरातील किन्होळा, आटोळा, सोमठाणा, देवलगावसह परिसरातील बहुतांश गावांमध्ये मृग नक्षत्रात झालेल्या पेरणीमुळे यंदा शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु, पिकांचे अंकुरण होऊन कोवळ्या पिकांनी डोकेवर काढताच या भागातील रोही व हरणांचे कळप पिकांचे शेंडे फस्त करत आहेत. त्यामुळे दुबार लागवडीच्या खर्चाबरोबरच नंतरही पिकांच्या उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. या भागात कुठेही माळरान, दाट झाडीची पडिक जमीन नसल्यामुळे या वन्य प्राण्यांचे कळप चारा पाण्याच्या शोधात सतत फिरून शेतीचे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरीवर्गाला सकाळी भल्या पहाटेपासून रात्रीपर्यंत शेतातच थांबावे लागत आहे. सततच्या सहवासाने हे वन्य प्राणीदेखील निर्भीड झाले असून, कितीही हाकलले तरी फिरून पुन्हा शेतावर येतात. त्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. वन विभागाने याचा बंदोबस्त करावा, याबाबत अनेकदा अर्ज करूनही वन विभागाला याचे कुठलेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांचा खर्च वाढला
शेतीत मशागत, पेरणी, खते, बियाणे औषधे, काढणी, मळणी याबरोबरच आता पिकांच्या संरक्षणाचा खर्च वाढला आहे. शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेताला कुंपण करणे, जाळ्या लावणे, याबरोबरच रात्रीच्या वेळी पहारा देण्यासाठी राखणदार लावणे अनिवार्य झाल्याने शेतकऱ्यांवर हा अधिकचा आर्थिक भुर्दंड पडून त्यांच्या खर्चात वाढ झाली आहे.
"पहिले कापसाचे पीक फस्त केल्यानंतर पाच एकरवर दुबार लागवड करूनही पीक संरक्षणासाठी आता दिवस रात्र राखण करावी लागत आहे.
नितीन खरवडे, शेतकरी किन्होळा
वनविभाग नावालाच
वन्य प्राण्यांपासून पिकांची नासाडी झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची तरतूद असली तरी त्यासाठी वन विभागाकडे अर्ज केल्यानंतर सदर प्रकरणाची शहानिशा संबंधित वनपाल अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व कृषी अधिकारी यांची समिती करते. त्यात पंचनामा करून पुरावे तपासून नुकसान क्षेत्राची मोजणी करत नुकसान मूल्य ठरवले जाते. परंतु तक्रार ,पंचनामा या गोष्टीसाठी वन विभागाकडे खेटे घालून मदत मिळेलच याची खात्री नसल्याने भरपाई मागणे म्हणजे ''रोगापेक्षा इलाज भयंकर'' अशी स्थिती असल्याने शेतकरी तक्रार देण्याच्या भानगडीत पडत नसल्याचे दिसते.