परभणी : जिल्ह्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनसह बेडचा तुटवडा निर्माण झाला असताना आरोग्य यंत्रणा मात्र पुढे येऊन या परिस्थितीवर भाष्य करीत नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये रोष वाढत चालला आहे. परिस्थिती बिकट आहे. आरोग्य यंत्रणेने चुप्पी साधून हा प्रश्न सुटणार नाही. तेव्हा उपलब्ध सुविधांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागील चार-पाच दिवसांपासून रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज नोंद होणाऱ्या रुग्णांमध्ये सरासरी ५ टक्केच रुग्ण गंभीर स्वरुपाचे असतील. दररोज चारशे ते सातशेपर्यंत रुग्णांची नोंद होत आहे. त्यातील बहुतांश रुग्ण घरी राहूनच उपचार घेत आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत आणि गंभीर रुग्णांचे प्रमाण ५ टक्के आहे. मात्र, रुग्णांच्या नातेवाईकांना समजावून घेऊन त्यांना मदत करण्याऐवजी आरोग्य यंत्रणा माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याने परिस्थिती आणखीच गंभीर होत चालली आहे.
जिल्ह्यात सध्या ऑक्सिजन बेडची कमतरता निर्माण झाली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा मराठवाड्यात सर्व ठिकाणी आहे. मात्र, उपलब्ध ऑक्सिजनचे योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातही बेडची संख्या कमी असल्याने ही संख्या वाढविण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत. मात्र, त्यादृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाहीत.
तालुक्यांचे सीसीसी बंदच...
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी कोविड रुग्णांवर उपचार केले जात होते. मात्र, यावेळी प्रशासनाने सेलू आणि गंगाखेड वगळता कुठेही कोरोना केअर सेंटर सुरू केले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे परभणी शहरातील आरोग्य यंत्रणेवर रुग्णवाढीचा ताण आला आहे. सेलू आणि गंगाखेड येथील कोरोना हॉस्पिटल सुरू करण्याबरोबरच तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार सुरू केल्यास परभणी शहरातील रुग्णांचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
रेमडेसिविरचा गोंधळ सुरूच...
जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होतील, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत असून, प्रशासनाचे नियोजन कागदोपत्रीच रहात आहे. जिल्ह्यात रेमडेसिविरचा किती साठा उपलब्ध आहे, याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून दिली जात नाही. शिवाय रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यास लावणे, हा प्रकार चुकीचा असून, डॉक्टरांनीच हे इंजेक्शन उपलब्ध करून रुग्णांवर उपचार करणे गरजेचे असताना तसे होत नाही. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर इंजेक्शनची चिठ्ठी घेऊन औषधी दुकाने फिरत आहेत. त्यातून ताण वाढू लागला आहे.