शहरातील आदित्य परिसरात रॉयल क्लिफ इंग्लिश स्कूल यावर्षी सुरू झाली आहे. या शाळेच्या इमारतीच्या परिसरात रामेश्वर संतराम घाटूळ, नामदेव सौदागर हे दोन मजूर पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. ३० जुलै रोजी पहाटे ४:३० वाजता मजुरांनी शाळेचे व्यवस्थापक राहुल बाहेकर यांना फोन करून शेडच्या दरवाजाची कडी बाहेरून कोणी तरी लावल्याची माहिती दिली. व्यवस्थापक बाहेकर यांनी तातडीने शाळेकडे धाव घेत मजुरांच्या शेडची कडी उघडली. त्यानंतर शाळेच्या इमारतीजवळ जाऊन पाहिले असता दरवाजे उघडे दिसून आल्याने अधिक पाहणी केली. तेव्हा १ लाख १२ हजार रुपये किमतीचे दहा ते बारा प्रकारचे विविध साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले. व्यवस्थापक राहुल भायेकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध ३१ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
चोऱ्यांचे सत्र थांबेना
मागील दहा ते पंधरा दिवसांपासून शहरात विविध ठिकाणी चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. हे चोऱ्यांचे सत्र थांबत नसल्याने शहरातील नागरिक धास्तावले आहेत. नाइट पेट्रोलिंगसाठी बीट मार्शलची स्थापना करून सुस्त असलेल्या पोलीस प्रशासनाने चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.