- अभिमन्यू कांबळेपरभणी - जिल्ह्यातून जाणाऱ्या जालना-परभणी समृद्धी द्रुतगती महामार्गावरील जमिनीचे दर तब्बल ५९ लाख ७८ हजार रुपये एकरपर्यंत पोहोचले आहेत. ज्या गावशिवारांमधून हा मार्ग जाणार आहे, त्या शिवारात ८ ते १० फुटांची फळझाडे आणि विहिरी तयार करण्याचे काम वेगाने सुरू असल्याची चर्चा होत आहे. नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाला जोडणारा जालना ते नांदेड दरम्यान १७९ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग राज्य शासनाने मंजूर केला आहे. या महामार्गासाठी २ हजार २०० हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार असून, परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, परभणी व पूर्णा या चार तालुक्यांतील ४५ गावांच्या शिवारातून हा महामार्ग जाणार आहे. या महामार्गाच्या भूसंपादनासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. राज्य शासनाने नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला बाजार मूल्याच्या पाचपट दर देण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवरच परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गासाठी भूसंपादनाचा दर द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भातील निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती घेणार असली तरी या भूसंपादनातून मोठा आर्थिकलाभ मिळवून घेण्यासाठी काही राजकीय नेते मंडळी सरसावली आहे. यातूनच या भागातील जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार वेगाने सुरू झाले आहेत.
मोबदल्याचे आकडे डोळे विस्फारणारे सेलू तालुक्यातील वालूर येथील एका जमिनीच्या खरेदी-विक्रीचा समोर आलेला व्यवहार या महामार्गावरील जमिनीचे वाढलेले दर स्पष्ट करणारा ठरत आहे. येथील एका शेतकऱ्याची एनए झालेली ४९ आर जमीन विकली गेली. या जमिनीचे शासकीय बाजार मूल्य ५९ लाख ७८ हजार रुपये दर्शविले असून, प्रत्यक्ष ठरलेली मोबदल्याची एवढीच रक्कम चक्क आरटीजीएसच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. १ एकर ९ गुंठे जमिनीसाठी ५९ लाख ७८ हजार रुपये दिले जात असले तरी शासनाकडून जो संभाव्य पाचपटीने मोबदला नंतर मिळणार आहे, तो किती असेल? याचे गणितच भल्या भल्यांची भंबेरी उडविणारे आहे.